"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 12:37 PM2024-06-13T12:37:29+5:302024-06-13T12:39:54+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.

NCP Ajit Pawar group has responded to the criticism made by RSS organiser article | "आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

NCP Ajit Pawar Group Slams RSS : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला चांगलेच फटकारले आहे. आधी भाजपाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत भाजप नेत्यांना फटकारले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकामध्ये भाजपच्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीबाबत एक लेख प्रसिद्ध करण्यात आला. या लेखातूनही भाजप नेत्यांचे कान टोचण्यात आले.  महाराष्ट्रातील भाजपच्या कामगिरीवर भाष्य करताना अजित पवारांना सोबत घेण्याची गरज काय होती असा सवालही या लेखातून करण्यात आला होता. या लेखाला आता राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे.

आरएसएसच्या 'ऑर्गनायझर' या मुखपत्रामधील अंकात संघाचे आजीव स्वयंसेवक असलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांबाबत लेख लिहिला आहे. लोकसभेच्या निकालाचे विश्लेषण करताना महाराष्ट्रातल्या अनावश्यक राजकारणाबाबत भाष्य करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला बहुमत असताना अजित पवार गटाला सोबत घेण्याची काय गरज होती? असा सवाल यातून विचारण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी यावर भाष्य केलं आहे. एक्स सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट करत  महायुतीत मिठाचा खडा टाकू नका असा इशारा दिला आहे. "भारतीय जनता पार्टीचा विजय झाला तर संघाच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि पराजय झाला तर अजित दादा मुळे. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल,रोष कोणावर आहे हे समजून घ्या..लिहता आणि बोलता आम्हाला पण येते लेख लिहून महायुतीत मिठाचा खडा टाकू नका," अशी पोस्ट सूरज चव्हाण यांनी केली आहे. 

काय म्हटलं होतं लेखात?

"महाराष्ट्र हे अनावश्यक राजकारण टाळता येण्याचे तसेच हेराफेरीचं उत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्रात जे घडलं ते टाळता आलं असते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सामील झाला. भाजप आणि शिवसेना (शिंदे गटाला) सहज बहुमत मिळालं असतं. शरद पवार दोन-तीन वर्षांत गायब झाले असते कारण चुलत भावांच्या भांडणात राष्ट्रवादीची ताकद संपली असती. हे चुकीचे पाऊल का उचलले गेले? ज्या काँग्रेसी विचारसरणीविरोधात वर्षानुवर्षे लढलो त्यांच्या संघावर टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याला पायघड्या घालण्यात आल्याने भाजपा समर्थक दुखावले गेले. एका फटक्यात भाजपने आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली. महाराष्ट्रात नंबर वन होण्यासाठी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, कोणताही संघर्ष न करता तो आणखी एक राजकीय पक्ष बनला," असे ऑर्गनायझरमध्ये म्हटलं आहे.

Web Title: NCP Ajit Pawar group has responded to the criticism made by RSS organiser article

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.