कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून लागू करण्यात आलेले निर्बंध आता उठवण्यात आले आहेत. मोठ्या आनंदात, उत्साहात सण, समारंभ साजरे केले जात आहेत. यंदा गणेशोत्सवही थाटामाटात, दणक्यात साजरा करण्यात आला. यानंतर भाजपाने, शिंदे-फडणवीस सरकारने अनेक ठिकाणी "आपले सरकार आले, हिंदू सणांचे विघ्न टळले" असे बॅनर्स आणि पोस्टर्स झळकावले आहेत. तसेच गणेशोत्सवात अनेक मंडपांबाहेरील या बॅनर्सवर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही फोटो दिसत होते.
राष्ट्रवादीने आता याच जाहिरातबाजीवरुन खोचक टोला लगावला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच शिंदे सरकारवरही निशाणा साधला आहे. भाजपाने लावलेल्या बॅनर्सपैकीच एका बॅनरचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "हिंदूंवर विघ्न आणणारे हेच ते आपले सरकार जे आता धर्माच्या नावाने जनतेत संभ्रम निर्माण करतंय, हिंदूंच्या लाखो तरुणांचा रोजगार गुजरातमध्ये पळवणारे हेच ते आपले सरकार" असं म्हणत टीका केली आहे.
"लाखो तरुणांचा रोजगार गुजरातमध्ये पळवणारे हेच ते आपले सरकार"
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "शेतकरी संकटात, परतीच्या पावसाने पिके उद्ध्वस्त, साधूना मारहाण, पशुधनावर लंपीचे आक्रमण! सरकार नसताना हिंदूंवर विघ्न आणणारे हेच ते आपले सरकार जे आता धर्माच्या नावाने जनतेत संभ्रम निर्माण करते आहे. हिंदूंच्या लाखो तरुणांचा रोजगार गुजरातमध्ये पळवणारे हेच ते आपले सरकार आहे" असं मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले, मोदीजी व शहांना नक्कीच खूश केले"
"वेदांत फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे 26 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणार होता, मात्र महाराष्ट्राची ही गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला आहे. वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची! तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खूश केले आहे" असा खोचक टोला देखील अमोल मिटकरी यांनी य़ाआधी लगावला होता.