Maharashtra Politics: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र अलीकडेच विधिमंडळात लावण्यात आले. यावरून आरोप-प्रत्यारोप, नाराजीनाट्य रंगल्याचेही दिसून आले. यातच आता बाळासाहेब ठाकरे यांचे एक तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याबाबत मागणी करणारे एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिण्यात आल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने बाळासाहेबांचे तैलचित्र संसद भवनात लावण्याची विनंती केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने विधिमंडळात तैलचित्र लावण्यात आले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र संसद भवनात लावण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
बाळासाहेबांचे तैलचित्र नवीन संसद भवनात लावण्याची नितांत आवश्यकता
महाराष्ट्राची अस्मिता असलेले शिवसेनाप्रमुख आणि प्रसिध्द संपादक, व्यंगचित्रकार, लेखक, सामना वृत्तपत्राचे संस्थापक तसेच एक प्रखर हिंदुत्ववादी व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेब ठाकरे यांची ओळख अखंड हिंदुस्थानाला आहे. मराठी माती आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचले. जगाच्या पाठीवर असे काही प्रभावी नेते होऊन गेले त्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या जडणघडणामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे थोर महापुरूष बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनातील सेंट्रल हॉलमध्ये लावण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे संसद भवनामध्ये येणाऱ्या सन्माननीय लोकप्रतिनिधींना सदैव प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल, असे पत्र छगन भुजबळ यांनी लिहिले आहे. थोर महापुरूष हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र नवीन संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये लावण्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येऊन त्याचा पाठपुरावा करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्रावरून उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्या कलाकाराने ते चित्र चितारले असेल, त्यांचा मला अपमान करायचा नाही. परंतु त्यांना योग्य तेवढा वेळ दिला आहे का, हे त्यांना विचारणे गरजेचे आहे. कारण घाईगडबडीमध्ये काहीतरी रंगवून ठेवायचे आणि हे तुझे वडील, असे सांगायचे. हे अजिबात चालणार नाही.बाळासाहेबांचे तैलचित्र लावत आहेत. त्याचा अभिमान आहे. पण त्यामागचा हेतू वाईट आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"