मुंबई: देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडलेल्या संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात चांगलेच राजकीय मानापमान नाट्य रंगलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पुण्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करू न दिल्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक नेते, कार्यकर्त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
देहूमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंचावर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देण्यात आली. मात्र, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही या कार्यक्रमात त्यांना भाषण करू दिले नाही. यानंतर अजित पवार यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला, अशी माहिती समोर आली. यानंतर राष्ट्रवादीकडून भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केले.
PM मोदींनी अजित पवारांना विचारले तो त्यांचा मोठेपणा
देहू येथील कार्यक्रमाला राज्याच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते यांना बोलायला संधी देता आणि राज्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री यांचे बोलण्याच्या यादीत नाव नाही हे चुकीचेच आहे. पंतप्रधानांनी अजित पवारांना विचारले तो त्यांचा मोठेपणा आहे. मात्र अजित पवार यांना माहीत होते की, यादीत आपले नावच नाही तर ते बोलतील कसे? अशी विचारणा भुजबळ यांनी केली आहे.
दरम्यान, सूत्रसंचालकाने देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यावर थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेतल्यानंतर त्यांनी अजित पवारांकडे हात करत तुम्ही बोला असे सांगितले. मात्र, अजित पवार यांनी आपण बोलावे, अशी भूमिका घेत मोदींकडे पाहून भाषणासाठीच्या पोडियमकडे हात केला. या प्रकरणावरुन सुप्रिया सुळे यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे असे म्हटले.