नागपूर: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंडखोरी केली आणि भाजपसह नवे सरकार स्थापन केले. बंडखोरी का केली, यापुढची भूमिका काय, हे सर्वांना माहिती होण्यासाठी शिंदे गटाकडून दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडे प्रवक्तेपदाची धुरा देण्यात आली. यानंतर वेळोवेळी माध्यमांसमोर येऊन केसरकर यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, अलीकडेच जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा सहभाग होता, असा दावा करत मोठी खळबळ उडवून दिली होती. यावर, आता खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका कार्यक्रमासाठी शरद पवार नागपुरात गेले होते. यावेळी शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी शक्य तिथे युती करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या भूमिकेचे समर्थन केले आहे. हे तिनही पक्ष एकत्र लढले तर लोकांना अपेक्षित असलेला निकाल मिळेल. माझेही तेच मत आहे. याबाबत आम्ही पक्ष पातळीवर चर्चा केली आहे, असे शरद पवार म्हणाले.
दीपक केसरकरांच्या आरोपांना शरद पवारांचे प्रत्युत्तर
दीपक केसरकरांच्या आरोपावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी आपल्यावरील आरोपाचं उत्तर दिले. शरद पवारांनी शिवसेना तीनदा फोडली, या वक्तव्याला फारसे महत्व द्यावे असे हे वक्तव्य नाही, असे शरद पवार म्हणाले. राज्यात अनेक ठिकाणी सध्या पूर परिस्थिती आहे. प्रशासन ठप्प आहे. फक्त दोघंच जण आहेत, राज्यातील परिस्थिती बघता हे नुकसानदायक आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, संसद भवन परिसरात निदर्शने, आंदोलने, उपोषणे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णायावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहात मागणी मान्य झाली नाही तर लोग सभात्याग करतात, मग बाहेर महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी जाऊन शांतपणे निदर्शने करतात. केंद्र सरकारने शांतपणे आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार काढून घेतला आहे, आम्ही बैठकीत ह्यावर चर्चा करू आणि हा प्रश्न कसा उचलायचा ते ठरवू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.