Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा अखेर ३८ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. त्याचवेळी दुसरीकडे बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. केवळ भाजप नाही, तर एनडीएला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी महागठबंधन केले आणि राजकीय वर्तुळाला धक्का दिला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाजपवर घणाघाती टीका केली असून, नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना, निवडणुकीत एकत्र यायचे, मित्र पक्षातील लोकांच्या जागा कशा कमी येतील याची काळजी घ्यायची घ्यायची आणि हळूहळू मित्रपक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेत फूट कशी पडेल, अशी परिस्थिती निर्माण केली. अशीच खेळी बिहारमध्ये सुरू होण्याआधीच नितीश कुमार वेळीच सावध झाले. त्यांनी तातडीने राजीनामा दिला. आता भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. परंतु नितीश कुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी महागठबंधन करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे.
भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्र पक्षांना हळूहळू संपवते
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी भविष्यात प्रादेशिक पक्ष शिल्लक राहणार नाहीत, असे म्हटले होते. देशात फक्त भाजप हाच पक्ष राहील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षांना हळूहळू संपवते. नितीश कुमार यांची हीच तक्रार आहे. पंजाबमध्ये अकाली दलासारखा मोठा पक्ष भाजपसोबत होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखे मोठे नेते भाजपची साथ देत होते. मात्र, अकाली दल हा पक्ष जवळपास संपुष्टात आला आहे. महाराष्ट्रातही शिवसेना आणि भाजप अनेकवर्षे एकत्र होते. भाजपने शिवसेनेची अवस्था काय केली आहे, अशी विचारणा करत भाजपने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. हेच चित्र बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे, या शब्दांत शरद पवार यांनी निशाणा साधला.
दरम्यान, महाराष्ट्रातही भाजपने शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढवताना त्यांचे कमी आमदार कसे निवडून येतील,याची काळजी घेतली. नितीश कुमार हे बिहारमध्ये मान्यता असलेले नेतृत्त्व आहे. त्यांनी सावध पवित्रा घेत भाजपपासून अंतर ठेवत बाजूला झाले. नितीश कुमार यांनी पुढील धोका ओळखून वेळेत खबरदारी घेतली. त्यांच्या राज्याच्यादृष्टीने आणि पक्षाच्यादृष्टीने नितीश कुमार यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे, असे शरद पवारांनी नमूद केले.