Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. त्याचवेळी दुसरीकडे बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. केवळ भाजप नाही, तर एनडीएला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी महागठबंधन केले आणि राजकीय वर्तुळाला धक्का दिला. यावरून आता राज्यातील विरोधक भाजपवर सडकून टीका करताना दिसत आहेत. यातच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी बिहारमधील सरकार कोसळण्याला एकनाथ शिंदे यांचे बंड जबाबदार असल्याचा मोठा दावा केला आहे.
केवळ भाजप नाही, तर एनडीएला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीशी महागठबंधन केले आणि राजकीय वर्तुळाला धक्का दिला. राज्यपालांकडे राजीनामा सुपुर्द करत १६४ आमदारांचे समर्थन पत्रही दिले. राजद, काँग्रेस आणि मांझी यांच्यासोबत आघाडी करून नितीशकुमार यांनी भाजपाला सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखविला आहे. भाजपाने जदयू फोडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालविल्याचा आरोप नितीशकुमार यांनी केला आहे. यातून सावध होत त्यांनी पक्ष वाचविला, असा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देताना, हाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपासोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळले, असे म्हटले आहे.
हळूहळू सर्व पक्ष भाजपपासून दूर गेले
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी भाजापाची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाशी युती केली. ज्यावेळी भाजप केंद्रात सत्तेत आली होती. त्यावेळी त्यांच्या सोबतीला अनेक मित्रपक्ष होते. पंजाबमध्ये अकाली दल, महाराष्ट्रात शिवसेना तसेच अटलजींच्या नेतृत्वात तृणमूलही भाजपासोबत होते. मात्र, हळूहळू सर्व पक्ष भाजपपासून दूर गेले. एकमेव नितीश कुमार राहिले होते, तेसुद्धा आता बाहेर पडले आहेत, असे एकनाथ खडसे म्हणाले.
नितीश कुमारांनी देशभरात एक मोठे उदाहरण दिले आहे
भाजप आमच्या कामकाजात सातत्याने दखल देत होती, असा आरोप नितीशी कुमार यांनी केला आहे. तशाच प्रकारचे आरोप अन्य पक्षांनीही सोडून जाताना केले होते. नितीश कुमारांनी देशभरात एक मोठे उदाहरण दिलं आहे. महाराष्ट्रात शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपसोबत युती केली आणि त्यातूच बिहारमध्ये सरकार कोसळले, अशी परिस्थिती आहे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.