बॉलीवूडमध्ये सर्वात मोठे योगदान मुस्लीम समाजाचे असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. ते म्हणाले, देशातील सर्वच क्षेत्रात अल्पसंख्याक आणि उर्दू भाषेचे योगदान आहे. एवढेच नाही, तर आज कला असो, लेखन असो किंवा कविता असो, सर्वात मोठे योगदान अल्पसंख्याकांचे आहे आणि ते उर्दू भाषेतून आले आहे. तसेच, बॉलीवूडला शीर्षस्थानी नेण्यात मुस्लीम अल्पसंख्याकांचे योगदान सर्वाधिक आहे, असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.
पवार पुढे म्हणाले, "आपल्यासमोर बॉलिवूड आहे. ज्यांनी याला सर्वोच्च स्थान मिळवून देण्यात सर्वाधिक योगदान दिले ते मुस्लीम अल्पसंख्याक आहेत. आणि आपण त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही."
'मुस्लिमांना त्यांचा योग्य वाटा मिळाला नाही' -विदर्भ मुस्लीम बौद्धिक मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'भारतीय मुसलमानों के सामने मुद्दे' या कार्यक्रमात संबोधित करताना पवार म्हणाले, "मुस्लीम समाजाच्या सदस्यांना वाटते, की देशाचा एवढा मोठा हिस्सा असूनही त्यांना त्यांचा न्याय्य वाटा मिळत नाही. जे प्रत्यक्षात वास्तव आहे. यामुळे त्यांना त्यांचा योग्य वाटा कशा पद्धतीने मिळू शकेल, यावर विचार व्हायला हवा."
सरकारी भरती परीक्षांमध्ये उर्दू भाषेची मागणी करणाऱ्या एका जुन्या वक्त्याला उत्तर देताना पवारांनी भाषेचे कौतुक केले. तसेच, अनेक लोक अनेक पिढ्यांपासून या भाषेशी जोडले गेले आहेत. आपण उर्दू शाळा आणि शिक्षणावर विचार करायला हवा. मात्र, उर्दू बरोबरच आपल्याला राज्याच्या मुख्य भाषेसंदर्भातही विचार करायला हवा," असेही पवार म्हणाले.