मुंबई: आताच्या घडीला देशात महागाईने नवा उच्चांक गाठल्याचे म्हटले जात आहे. पेट्रोल, डिझेल, गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सर्वसामान्य जनतेचे महिन्याचे गणित दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रावर टीका करताना महागाई कमी करण्यासाठी सरकारचे काय नियोजन आहे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आतातरी माध्यमांशी बोलावे, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी महागाईवरून केंद्रावर हल्लाबोल केला आहे. देशात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. अच्छे दिन आणण्याचे स्वप्न जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, आज महागाईमुळे लोकांचे दरडोई उत्पन्न कमी झाले आहे. वाढती महागाई लपवण्यासाठी जातीय तणाव निर्माण करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती दिनी घडलेला हिंसाचार हा या षडयंत्राचाच भाग होता. केवळ आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जातीपातीचे आणि द्वेषाचे राजकारण केले जात आहे, असा आरोप महेश तपासे यांनी केला. महागाई कमी करण्यासाठी सरकारचे काय नियोजन आहे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतातरी माध्यमांशी बोलावे, असे आवाहन त्यांनी केले.
देशात पुन्हा यूपीए सरकार येणार हे निश्चित आहे
'सत्तर वर्षात जे झाले नाही ते आम्ही करून दाखवू' अशी घोषणा भाजपने केली होती. त्यानुसार सत्तर वर्षात झाली नाही इतकी महागाई भाजपने करून दाखवली आहे, असा टोला महेश तपासे यांनी लगावला. तसेच शरद पवार यांना आम आदमी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी पत्र लिहिले आहे. देशात जे धार्मिक द्वेषाचे राजकारण सुरू आहे त्याविरोधात पवारांनी आवाज उठवावा, असे त्यांचे म्हणणे आहे. या पत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत असल्याचे तपासे यांनी नमूद केले. याच मुद्द्यावर भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र येण्यास सुरुवात झाली असून देशात पुन्हा यूपीए सरकार येणार हे निश्चित आहे. तो दिवस आता दूर नाही, असेही तपासे म्हणाले.
दरम्यान, धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, त्यांचे हात बळकट व्हावे आणि सर्वांनी मिळून संविधानाचे रक्षण केले पाहिजे, ही भूमिका शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे. त्याच्या या भूमिकेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कॉंग्रेसचीही साथ आहे, असे तपासे म्हणाले.