राजगुरूनगर- प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, स्व. सुरेश गोरे यांना त्या त्या वेळी पक्षातल्या नेत्यांनीच, आम्हाला विरोध म्हणून ताकद दिली. पण ते निष्ठावंत नसल्याने इतर पक्षात गेले. आमचे कार्यकर्ते निष्ठावंत असूनही सतत डावलण्याचा प्रयत्न होतो. फक्त अजितदादा पवारांचे उपकार आहेत, अन्यथा आम्ही उघडे पडलो असतो. म्हणून पहिल्यांदा पक्षनेत्यांनाच पक्षशिस्त शिकवायला पाहिजे अशी तोफ आमदार दिलीप मोहिते यांनी येथे डागली. त्यांनी वागणे सुधारले नाही, तर वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, निर्मला पानसरे, अरुण चांभारे, विनायक घुमटकर, धैर्यशील पानसरे, अरुण चौधरी, अनिलबाबा राक्षे, नवनाथ होले, काळूराम कड, वसंत भसे, शांताराम सोनवणे, हिरामण सातकर, जीवन सोनवणे, कैलास लिंभोरे, संभाजी खराबी, मयूर मोहिते, शरद मुऱ्हे, अरुण थिगळे, राहुल नायकवाडी, राम गोरे, वैभव घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, संध्या जाधव, सुगंधा शिंदे, आशा तांबे, मनीषा सांडभोर, मनीषा पवळे-टाकळकर आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष गारटकर यांनी आपल्या भाषणात पक्ष कार्यकर्त्यांनी पक्षशिस्त पाळण्याचे आग्रही आवाहन केले. तो धागा पकडून मोहिते यांनी टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, ' जिल्हा परिषद स्थापनेनंतर पहिल्यांदा खेड तालुक्याला आमच्या म्हणण्यानुसार अध्यक्षपद मिळाले. मात्र यापूर्वी अनेकदा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. आमच्या पक्षांतर्गत विरोधकांना ताकद दिली गेली. त्या ताकदीवर ते इतर पक्षात गेले. दूध संघाला अरुण चांभारे पक्षाच्या पॅनेलचे उमेदवार होते. त्यांचे विरोधक जे कायम विरोधी पक्षांना मदत करीत आले, त्यांचे मतदार आंबेगाव तालुक्यात सांभाळण्यात आले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या कार्यक्रमात नेत्यांसमोर मला बोलायला डावलून माझा अपमान केला गेला, तरी नेते गप्प बसले. ज्यांच्याकडे सत्तापदे आहेत, त्यांनी तरी शिस्त पाळायला नको का? कार्यकर्त्यांना आपण कोणती शिस्त पाळायला सांगणार ? '
माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे पुढारी कम कॉन्ट्रॅक्टर आहे. सगळ्या रस्त्यांचे आणि बंधाऱ्याचे त्यांनी वाटोळे केले. त्यांनी केलेल्या कामाची चौकशी लावणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुखांनी कोणाला थप्पड मारलेली नाही. ते फक्त भाईगिरीचा आव आणतात. कार्यकर्त्यांनी अशा कोणाला घाबरू नये. ज्यांनी पापे केलीत त्यांना योग्य वेळ आल्यावर हिशोब द्यावाच लागणार आहे, अशी टीका त्यांनी तालुक्यातील विरोधकांवर केली. कैलास सांडभोर यांनी प्रास्ताविक केले. उमेश गाडे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिनेश कड यांनी आभार मानले.