मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अयोध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. पुढच्या महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर त्यापूर्वी शिवसेना नेते आणि पर्यटन मंत्री अयोध्येचा दौरा करण्याची शक्यता आहे. अयोध्येवरून शिवसेना, मनसेमध्ये हिंदुत्वाची स्पर्धा सुरू असताना आता राष्ट्रवादीलासुद्धा अयोध्येचे वेध लागले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार उद्या अयोध्येत जाणार आहेत. उद्या दुपारी १२ वाजता रोहित पवार अयोध्येला पोहोचतील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील. रोहित पवार काही कामानिमित्त सध्या दिल्लीत आहेत. तिथूनच ते अयोध्येसाठी रवाना होतील. रोहित पवार यांचा अयोध्या भेटीचा कार्यक्रम अचानक ठरल्याचं समजतं.
रोहित पवार उद्या अयोध्येत असतील. त्यांच्या अयोध्या दौऱ्याचं टायमिंग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. शरद पवार नास्तिक आहेत. त्यामुळे ते नास्तिकतेच्या नजरेतून धर्माकडे पाहतात, अशी टीका राज यांनी नुकत्याच झालेल्या सभांमध्ये केली. शरद पवार मंदिरात गेल्याचा, देवासमोर नतमस्तक झाल्याचा फोटो क्वचितच आढळेल. कारण ते देव मानत नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले होते. राज यांच्याकडून अशी टीका होत असताना शरद पवारांचे नातू रोहित पवार अयोध्येत जाणार आहेत.