Maharashtra Political Crisis: “ज्या जोशात मविआ सरकार पाडलं, त्या उत्साहात कामे होताना दिसत नाहीत”; सुप्रिया सुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 04:17 PM2022-09-04T16:17:31+5:302022-09-04T16:19:03+5:30
Maharashtra Political Crisis: अजित पवार सकाळी ६ वाजल्यपासून काम करायचे. आता मात्र नव्या शिंदे-भाजप सरकारमध्ये काहीच कामे होताना दिसत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ शिवसेना नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यादेखील कमालीच्या सक्रीय झाल्या असून, आक्रमकपणे नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधताना दिसत आहेत. ज्या उत्साहाने आमचे सरकार पाडले त्या उत्साहाने कामे होत नाहीत, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी, गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला ते कुणाच्या तरी घरीच दिसतात, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. राम शिंदे बारामती पाहणी करण्यासाठी आले आहेत. त्यांचं मनापासून स्वागत करते. बारामती पाहण्यासारखी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि महत्त्वाचे नेते सगळे बारामतीत आले आहेत. मी लोकप्रतिनिधी म्हणून स्वागत करेन, असे खोचक पलटवार सुप्रिया सुळे यांनी केला.
अजित पवार सकाळी ६ वाजल्यपासून काम करायचे
राज्यात कुठेही पालकमंत्री नाहीत. कोरोना असो किंवा नसो अजित पवार सकाळी ६ वाजल्यपासून काम करत असायचे. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. दर शुक्रवारी त्यांच्या मॅरेथॉन मिटिंग व्हायच्या. आता पालकमंत्रीच नाहीत. त्यामुळे कामेही होताना दिसत नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मी मंत्र्यांची वेळ मागत आहे. पण वेळ मिळत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल. मंत्री फक्त कुणाच्या तरी घरी दिसत आहेत. फक्त गाठीभेटी होत आहेत. एक किलोमीटरच्या आतचा दौरा करत आहेत. हे नवलच आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणले गेलेय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात. अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर करताना, भाजपला कुठलीही दडपशाही नाही. त्यांच्यात कोणी कुणाला भेटू शकतो, असे सांगत राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या वाढलेल्या भेटी-गाठींवर प्रतिक्रिया दिली.