“हवे तर आम्ही भारत नाव घेतो, पण हात जोडून विनंती करते की...”; सुप्रिया सुळेंची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:07 PM2023-09-08T12:07:50+5:302023-09-08T12:12:40+5:30
Supriya Sule News: इंडियाचे भारत नाव करण्याच्या हालचालींच्या तर्क-वितर्कावरून सुप्रिया सुळेंनी भाजपवर सडकून टीका केली.
Supriya Sule News: इंडिया की भारत याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. केंद्र सरकारने संविधानातून इंडिया हा शब्द हटवण्याची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. याबाबतीत देशभरात संमिश्र मतमतांतरे असल्याचे दिसत आहे. इंडिया की भारत यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत असून, विविध स्तरांतून याचे स्वागत होत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
इंडियाचे भारत होणार आहे आणि त्यासाठीच विशेष अधिवेशन बोलवले गेले आहे या चर्चा अजूनही सुरु आहेत. तसेच भारतीय संविधानात इंडिया आणि भारत या दोन्ही नावांबाबतही बराच उहापोह सुरु आहे. या सगळ्या चर्चेत आता खासदार सुप्रिया सुळेंनी सरकारला हात जोडून विनंती केली आहे. आम्ही हवे तर भारत नाव ठेवतो पण जनतेच्या डोक्यावर १४ हजार कोटींचा बोजा टाकू नका, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पण हात जोडून विनंती करते की...
आम्ही आमच्या आघाडीला इंडिया नाव दिले. त्यामुळे आता जनतेच्या डोक्यावर १४ हजार कोटींचा बोजा येणार आहे. आम्ही इंडिया नाव दिले कारण हे चांगले नाव आहे. पण आमचे विरोधक इतके घाबरले की, ते आता इंडियाचे भारत करणार आहेत. माझी भाजपला हात जोडून विनंती आहे की, हवे तर आम्ही नाव भारत ठेवतो पण तुम्ही इंडिया नाव बदलून जनतेच्या डोक्यावर १४ हजार कोटींचा बोजा लादू नका, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आपला देश गरीब आहे. १४ हजार कोटी हे आमच्या गरीब मायबाप जनतेचे आहेत. हे पैसे नाव बदलण्यासाठी खर्च करु नका. १४ हजार कोटींमध्ये सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी देता येईल आजच्या अडचणीच्या काळात. १४ हजार कोटींमध्ये भारतात रुग्णालये बांधता येतील. १४ हजार कोटींमध्ये देशभरात शाळा उभारल्या जातील. १४ हजार कोटींचा खर्च नाव बदलण्यासाठी येणार आहे, असे मी वर्तमानपत्रात वाचले त्यामुळे मोदी सरकारला आणि भाजपला आवाहन करते आहे की, जनतेचे हे पैसे फक्त नाव बदलण्यासाठी खर्च करु नका, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.