नवी दिल्ली/सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या महिन्याभरापासून उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू होती. अखेर आज उदयनराजे भाजपात प्रवेश करतील. त्यासाठी जलसंपदा गिरीश महाजन त्यांना घेऊन दिल्लीला जाणार आहेत. आज रात्री भाजपाचे अध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होईल. यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.उदयनराजे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटदेखील घेतली होती. यानंतर राष्ट्रवादीनं उदयनराजेंना पक्षात ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. उदयनराजे काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी गेले होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर मुंडेंनी उदयनराजे राष्ट्रवादीतच राहतील, असा विश्वासदेखील व्यक्त केला होता.शरद पवारांच्या आधी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही गुप्त बैठक घेत उदयनराजेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या दोन्ही भेटींचा कोणताही उपयोग झाला नाही. उदयनराजे यांनी अनेकदा स्वपक्षावर टीका केली आहे. अनेकदा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वालादेखील जमलेलं नाही. त्यामुळेच त्यांना भाजपात घेतलं जाऊ नये, असं पक्षातल्या एका गटाचं मत होतं. या कारणामुळे उदयनराजेंचा पक्ष प्रवेश रखडला होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
घड्याळ सोडणार, कमळ धरणार; अमित शहांच्या उपस्थितीत उदयनराजे भाजपात प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 11:33 AM