राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं भरभरून कौतुक करतानाच, अप्रत्यक्षपणे त्यांना मतं देण्याचं आवाहन केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
'तुम्ही आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे निर्णय घेतले, ते यापूर्वी कुणीही घेतले नव्हते. घोषणा भरपूर झाल्या, पण अंमलबजावणी झाली नव्हती', असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र सरकारची पाठ थोपटली. साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसही स्टेजवर होते.
एका महिन्याभरात माझं लग्न आहे आणि तीन-चार महिन्यांनंतर या सगळ्यांचं लग्न आहे. अक्षता टाकायचं काम करा एवढंच सांगतो तुम्हाला. इतक्यात टाकू नका. नाहीतर त्यावेळी म्हणाल, तुम्ही सांगितल्या म्हणून अक्षता टाकल्या आता शिल्लकच राहिल्या नाहीत, असं मजेशीर; पण तितकंच सूचक वक्तव्य उदयनराजे यांनी केलं.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानं, राष्ट्रवादी काँग्रेसने आपले काही उमेदवार निश्चित केलेत. परंतु, सातारा लोकसभा मतदारसंघातला उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे उदयनराजेंना तिकीट मिळणार की नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, उदयनराजेंनी देवेंद्र सरकारसाठी बॅटिंग केल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.