महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोलमाफीबाबत माध्यमांसमोर केलेलं विधान आणि प्रत्यक्षात मोठी विसंगती दिसून आली आहे. मनसेने पुन्हा एकदा टोलमाफीचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. याच दरम्यान टोलमाफीच्या या मुद्दयावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने थेट भूमिका घेतल्याचं दिसून आलं. मात्र, तिने भूमिका घेतल्यानंतर तिच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकण्यात आल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.
तेजस्विनीच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आक्रमक झाले आहेत. "हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार? इतका कपटीपणा योग्य नाही" असं म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का?" असा संतप्त सवाल ही रोहित पवार यांनी विचारला आहे.
"विरोधात व्हिडीओ टाकला म्हणून ट्रोल गँग वापरून ट्रोल करायचं, ट्विटरची ब्लू टिक काढायची, हे अत्यंत खालच्या पातळीवरचं राजकारण आहे. अशाप्रकारे कुणाकुणाचा आवाज दाबणार? इतका कपटीपणा योग्य नाही. प्रत्येकाला विचारधारेचं, आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मुलभूत अधिकारही आहे, परंतु सत्तेचा गैरवापर करून आपण हा मुलभूत अधिकारही हिरावून घेणार का?" असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच TejswiniPandit हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
तेजस्विनी पंडितने यानंतर कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही, असं म्हणत सरकारला लक्ष्य केलं आहे. "माझ्या X (ट्विटर अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं. कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (ट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात, त्याबद्दल धन्यवाद. पण बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही."
"सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्यवेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे! जय हिंद जय महाराष्ट्र!" असं तेजस्विनी पंडितने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.