Sharad Pawar NCP : शरद पवारांनी सोपवली मोठी जबाबदारी; प्रफुल्ल पटेल म्हणाले, "माझ्यासाठी पद..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 01:33 PM2023-06-10T13:33:42+5:302023-06-10T13:34:49+5:30
सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचा आज २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संबोधित करताना पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या दोघांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष पद देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यानंतर कार्यकर्ते आणि नेतेमंडळींच्या आग्रहास्तव त्यांनी आपला निर्णय मागे घेतला. प्रफुल्ल पटेल यांनी पवारांच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली.
"माझ्यासाठी पद महत्त्वाचं नाही. मी पूर्वीपासूनच काम करतोय. शरद पवारांसोबत देशभरात मी दिसत होतो, पक्षासाठी काम करत होतो. पद नवीन असलं तरी जबाबदारी तिच आहे. मला ती पार पाडायाची आहे. आजपर्यंत ती पार पाडत होतो आणि यापुढेही पार पाडेन. पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणं आणि यशस्वी करणं ही महत्त्वाची जबाबादारी आमच्यावर आहे," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.
"पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळवून देणं ही सर्वाची जबाबादारी आहे. नागालँडमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली. आणखी राज्यांमध्ये आमचे आमदार आणि मतांची टक्केवारी आणू शकू ही महत्त्वाची बाब राहील. पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळाल्यानंतर ती जाणं ही शोभणारी बाब नाही. आम्हालाही दु:ख आहे. राजकारणात चढ उतार असतात. आता उतार असला तरी आम्ही नक्कीच प्रगती करणार," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
२४ वर्ष सेवा करण्याची संधी - पवार
२४ वर्षे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. भाजपाला अनेक राज्यांनी दूर केलेय, आता तुमची जबाबदारी. सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावं, असं आवाहन शरद पवार यांनी केलं. यानंतर पवार यांनी पुन्हा बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीतील जबाबदाऱ्यांची घोषणा केली.