शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये गुफ्तगू; राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:28 AM2022-05-16T05:28:26+5:302022-05-16T05:29:44+5:30
अपक्ष मतांची जुळवाजुळव करणारा एखादा ‘वजनदार’ उमेदवार देऊन भाजपला शह देता येईल का, याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. १० जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या रणनीतीवर दोघांमध्ये मुख्यत्वे चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाल्याचे कळते.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सुमारे ४५ मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे भाजपला दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळेल, हे निश्चित मानले जात आहे. महत्त्वाची असेल ती सहावी जागा. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. अशा वेळी सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीची रणनीती काय असावी याबाबत पवार-ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
सहाव्या जागेसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा
- अपक्ष मतांची जुळवाजुळव करणारा एखादा ‘वजनदार’ उमेदवार देऊन भाजपला शह देता येईल का, याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
- महाविकास आघाडीतील मुख्यत्वे शिवसेना व राष्ट्रवादीकडील अतिरिक्त मते व महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची मते या आधारावर सहावी जागा जिंकता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल.
- तथापि, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते याबाबत एकत्र बसून अंतिम निर्णय करतील, असे आजच्या भेटीत ठरल्याचे समजते.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या सभेत भाजप, केंद्र सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवरही ठाकरे-पवार भेटीला महत्त्व आहे.