शिर्डी - २०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. भविष्य काळात संघर्ष उभा राहिला आहे. निवडणुकीचा काळ असल्याने आपण सर्वांनी वैचारिक संघर्ष करण्याच्या तयारीने काम करण्याची गरज आहे. आपला पक्ष फोडला. त्यामुळे मागच्या शिबिरात अनेक दिग्गज होते. ते निघून गेल्यानं यावेळी मागच्या फळीत बसलेल्यांना यंदा पुढे येण्याची संधी मिळाली. त्यामुळे तुम्हा सर्वांचे प्रमोशन झालं त्याबद्दल मी शुभेच्छा देतो असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या शिबिरात ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले की, नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे तुम्हाला पुढे बसण्याची संधी मिळाली नाहीतर तुम्हाला पुढे येण्याची संधी मिळाली नसती. त्यामुळे पुढे बसलेल्यांनी गेलेल्यांचे आभार माना असा विनोदी शैलीत चिमटा अजित पवार गटाला काढला. आपल्या नेत्यांना त्रास देण्याचे काम झाले. अनिल देशमुखांसारख्या नेतृत्वाला तुरुंगात जायची वेळ आली. नवाब मलिकांवर काय प्रसंग आला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सर्वांना या त्रासातून पुढे जाताना शरद पवारांची साथ न सोडण्याचं आम्ही ठरवलं. आम्ही शाहू-फुले आंबेडकरांचे विचार मांडतो. शरद पवारांनी उभ्या आयुष्यात हा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची ज्योत पेटवली. महात्मा फुलेंनी ज्ञानाची ज्योत, छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली. या सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन डॉ. बाबासाहेबांनी संविधानाची चौकट आखली असं त्यांनी म्हटलं.
तसेच समाजात अनेक घटक मागे राहिले त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून पुढे आणण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यानंतर समाजात केवळ जातीभेद नसून स्त्री-पुरुष भेदही आहे. त्यातून महात्मा फुलेंनी महिलांना पुढे आणण्याचा विचार दिला. हाच विचार घटनेच्या चौकटीत बसवण्याचं महान काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. राष्ट्रवादीला पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायची आहे. पुढील २ दिवसांच्या शिबिरात अनेक विचार आपल्यासमोर येतील. देशातील परिस्थिती आपल्या समोर येईल. आपण बोलण्यात कमी पडतोय. समोरच्या बाजूने जाहिरात प्रचंड आहे. त्यामुळे आपले बोलणे दाखवले जात नाही किंवा प्रचार होत नाही. लोक ऐकत असतात. आपण सगळ्यांनी बोलले पाहिजे. ज्या विचारांसाठी राजकारण करतोय त्याला महत्त्व दिले पाहिजे असंही आवाहन जयंत पाटील यांनी केले.
दरम्यान, जसं निवडणुका जवळ येत चालल्यात तसं आपण घराघरात राष्ट्रवादी हे अभियान राबवलं. काही मतदारसंघात प्रामाणिक कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत पोहचले. शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा आपण काढला. डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे जिल्ह्यात दौरा काढला. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. कोल्हे यांनी शिवशंभूचा विचार महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोहचवला. त्यांना पाडण्याचा विडा आता काही जणांनी उचलला आहे. त्यामुळे जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे तोपर्यंत अमोल कोल्हे यांनी घाबरण्याचं कारण नाही. सगळा पक्ष तुमच्यामागे ताकदीने उभा आहे असंही जयंत पाटलांनी सांगत अजित पवारांवर निशाणा साधला.