सोलापूर: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. एसटी कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या महिलांनी आक्रोश केला होता. या आंदोलकांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सामोऱ्या गेल्या होत्या. मात्र, काही केल्या आंदोलक माघार घेण्यास तयार नव्हते. यासंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. सिल्व्हर ओकवर आंदोलन करणाऱ्या २२ महिलांना भेटण्याची इच्छा आहे. त्यांच्या वेदना जाणून घ्यायच्या आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सोलापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांना सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनाबाबत विचारण्यात आले. अशा स्वरूपाचे आंदोलन अथवा हल्ला यापूर्वी कधी झाला नव्हता. कदाचित आंदोलनाची ही परंपरा महाराष्ट्राच्या राजकारणात नाही. पण कुणी भडकवले ते पाहावे लागेल. या आंदोलनाच्यानिमित्ताने ज्या २२ जणींनी आपला आक्रोश व्यक्त केला, त्यांना भेटायचे असून, त्यांच्या वेदना जाणून घ्यायच्या आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी-उद्धव ठाकरे यांची भेट ही चांगलीच गोष्ट
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी महविकास आघाडी सरकार कोसळण्यासंदर्भात नवी तारीख दिली आहे. यावर बोलताना, तारीख पे तारीख हे सिनेमात छान वाटते. तो सिनेमा आणि हे वास्तव आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलगी आहे. मी सत्तेसाठी राजकारणात आलेली नाही. सत्ता येते आणि जाते. ती कोणाची पर्मनंट नसते. सत्ता असतानाही लोकांची सेवा करता येते आणि सत्ता नसतानाही लोकांची सेवा करता येते, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावर, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
दरम्यान, अलीकडेच अहमदनगर येथे सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता शाब्दिक हल्ला केला. आपण दोन वर्षांनंतर कोरोना महामारीतून बाहेर पडत आहोत. अशा परिस्थितीत समाजात द्वेष पसरवत आहेत. हे स्वत: काहीही कामे करीत नाहीत. केवळ भाषणे करतात. लोकांना देव, धर्मावरून भडकावतात. आपण मंदिरात प्रसन्न मुद्रेने जातो; पण यांचा मंदिरात गेल्यावर चेहरा पाहा. त्यावर काहीही हावभाव नसतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. भोंगा महत्त्वाचा की महागाई असा प्रश्न प्रत्येकाने घरात विचारला तर ‘महागाई’ असेच उत्तर येईल, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.