आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केल्याच्या आरोपांमुळे भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या अडचणीत आले आहेत. किरीट सोमय्यांचा काल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आज नील सोमय्यांनाही न्यायालयाने दणका दिला आहे.
अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. परंतू दोघेही नॉट रिचेबल आहेत. सोमय्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे म्हटले आहे. सोमय्यांचे वकील आणि सरकारी वकिलांनी या प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता. तो सायंकाळी देण्यात आला. विक्रांत निधी संकलन प्रकरण २०१३ मधलं आहे. त्या प्रकरणी आता एफआयआर दाखल झाला आहे. यासाठी दबाव आणण्यात आला होता, असा युक्तिवाद सोमय्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. शिवसेना आणि इतर पक्षांनीदेखील विक्रांतसाठी निधी गोळा केला होता. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जमा केलेला निधी आपल्या पक्षाकडे सुपूर्द केला, असंही सोमय्यांचे वकील पुढे म्हणाले.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावली आहे. उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे यात म्हटले आहे. दोघांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेनं तीन पथकं तयार केली आहेत. सोमय्या चौकशीसाठी हजर न राहिल्यास त्यांच्या शोधासाठी तीन पथकं रवाना होतील. त्यामुळे उद्या हजर न झाल्यास सोमय्यांच्या अडचणी वाढू शकतात.
गृह विभागाला ठावठिकाणा माहीत नाहीभाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांचा ठावठिकाणा माहिती नाही. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघे नेमके कुठे गेले, त्यांचा ठावठिकाणा काय, याची माहिती गृह विभागाकडे नाही.