नवीन अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांमुळे विदयार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल - विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 04:43 PM2018-04-04T16:43:21+5:302018-04-04T16:43:21+5:30
बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला.
मुंबई : बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे आणि त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला.
केंद्र सरकारने दिलेल्या अध्ययन निष्पत्तीचा समावेश बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमांच्या प्रत्येक विषयाच्या पाठयपुस्तकांमध्ये करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्व राज्यांमध्ये पहिले असेल, असे विनोद तावडे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य पाठ्युपस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ (बालभारती) निर्मित इयत्ता दहावीच्या सर्व माध्यमांच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पाठयपुस्तकाचे प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते आज दादर येथे शिवाजी मंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अभ्यासमंडळातील विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत.
एसएससी आणि सीबीएसई या दोन्ही मंडळांच्या अभ्यासक्रमांमध्ये जास्त फरक नसतो. सीबीएसई मंडळाच्या तुलनेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्येही अधिक वाढ व्हावी यादृष्टीने बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे सीबीएससी आणि आयसीएससीच्या विदयार्थ्यांना एसएससी बोर्डाचे विद्यार्थी सामना करु शकतील असा विश्वासही असेही तावडे यांनी व्यक्त केला. नवीन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकातील धडयांमध्ये क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला असून या डिजिटल पध्दतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक व सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांबरोबर प्रत्येक विषयाची मूल्यमापन पध्दती कशी असेल याबाबतचा तपशील देणारी हस्तपुस्तिका देण्यात येणार आहे. या पुस्तिकेच्या आधारे विद्यार्थ्यांना विषयाची ओळख, विषययोजना,कृतीपत्रिका, प्रश्नपत्रिका याचे स्वरुप व निर्मितीचे निकष आणि याआधारे विद्यार्थ्यांना मूल्यामापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले. नव्या अभ्यासक्रमात शब्दसंपत्तीचा विकास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, स्वअध्ययन, चिकित्सक वृत्ती, निरीक्षण, निर्णयक्षमता, जबाबदार नागरिकत्वाचेभान, उद्योग-व्यवसायाशी निगडित शिक्षणावर भर देण्यात आल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी अभ्यासक्रमाच्या अभ्यासमंडळाचे विषय तज्ञ यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभ्यासमंडळाच्या सर्व विषय तज्ञांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे तसेच बालभारतीने वेळेचे नियोजन करीत दहीवीच्या सर्व माध्यमांची नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके वेळेत बाजारात उपलब्ध करुन दिल्याबद्दल तावडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. या प्रसंगी तावडे यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. याप्रसंगी बालभारतीचे सुनिल मगर, विवेक गोसावी तसेच अभ्यासमंडळातील सर्व विषय तज्ञ उपस्थित होते.