जयपूर : देशाची आघाडीची सर्वांत मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया नववर्षाच्या प्रारंभीच ग्राहकांना मोठी खूशखबर देणार आहे. गृह कर्जाच्या व्याजात कमालीची कपात करण्यात येणार असल्याचे संकेत एसबीआयच्या व्यवस्थापकीय संचालक पी के गुप्ता यांनी दिले आहेत.
एका हिंदी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे संकेत दिले आहेत. एसबीआय गृह कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करणार आहे. सध्या हा व्याजदर 8.15 टक्के आहे. या कर्जांचा थेट रेपो रेटसोबत संबंध जोडण्यात येणार असल्याने हे शक्य होणार आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केला तरीही बँका त्याचा फायदा ग्राहकांना देत नव्हत्या. आरबीआयने दट्ट्या आणल्यानंतर बँका हा फायदा गेल्या काही महिन्यांपासून देत आहेत. यामध्ये एसबीआयचा पहिला क्रमांक असतो.
येत्या 1 जानेवारीपासून गृह कर्जापासून सर्व उत्पादने ही रेपो रेटशी थेट जोडली जाणार आहेत. अनेक वर्षांनंतर ही प्रक्रिया लागू होणार आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना 8 टक्क्यांपेक्षा कमी दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे 1 जानेवारीपासून ग्राहकांना 7.90 टक्के दराने व्याजदाराचा लाभ मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीची सुरूवात 1 जानेवारीपासून होत आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.
महागाई उच्चांकावर आहे. हे आरबीआयनेही स्पष्ट केले आहे. यामुळे रेपो दरात कपात केली गेली नाही. महागाई कमी झाल्यावर दरात कमी करण्याची शक्यता आहे. जर मार्चमध्ये महागाई दर कमी झाला तर रेपो दरात कपात होईल, असेही गुप्ता यांनी सांगितले.