निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातल्या दोषींना फासावर चढवण्याची तारीख आता निश्चित झालीय. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं चारही दोषींच्या फाशीसाठी २० मार्च ही तारीख निर्धारीत केली आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकरू, विनय शर्मा आणि मुकेश या चारही जणांना २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता फासावर लटकावण्यात येणार आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर दोषींना देण्यात येणाऱ्या फाशीचे थेट प्रक्षेपण सर्व वृत्तवाहिन्यांवर करण्यात यावे अशी मागणी मनसेने केली आहे.
Nirbhaya Case : निर्भयाच्या दोषींना 20 मार्चला फासावर लटकवणार, नव्याने डेथ वॉरंट जारी
मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत सांगितले की, 'निर्भया'वर अत्याचार करणाऱ्या चार दोषींना फाशी देण्यासाठी न्यायालयाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे. त्यानूसार २० मार्चला पहाटे ५.३० वाजता दोषींना फाशी होणार आहे. खरंतर, ही फाशी सर्व वृत्तवाहिन्यांवर live दाखवायला हवी. देशातल्या निर्भयांचे- महिलांचे बळी घेणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यास ह्या देशाचा कायदा सक्षम आहे, हा संदेश जाणं खूप गरजेचं असल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.
निर्भयाच्या दोषींना याआधी ३ मार्च रोजी या दोषींना फाशी दिली जाणार होती. मात्र ती तारीख टळली. आरोपी पवन कुमारची याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली होती. मात्र कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार ही तारीख टळली होती. डेथ वॉरंटसाठी पुढची तारीख मिळेपर्यंत या चारही दोषींच्या फाशीला स्थगिती देण्यात आली होती. आता आज काही वेळापूर्वीच या आरोपींच्या फाशीसाठी नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
पवनचा दयेचा अर्ज हा शेवटचा होता. आता चारही खुन्यांचे कोणत्याही प्रकारचे अर्ज कुठेही प्रलंबित नाहीत. तेव्हा नव्या तारखेचे डेथ वॉरंट लगेच जारी करावे, असा आग्रह प्रॉसिक्युटर इरफान अहमद यांनी धरला होता.मात्र, दोषींना नोटीस न देता असे वॉरंट काढणे नैसर्गिक न्यायाला धरून होणार नाही, असे नमूद करून न्यायालयाने चारही खुन्यांना औपचारिक नोटीस काढून गुरुवारी सुनावणी ठेवली होती.