मुंबई - वीजबिल थकबाकी वाढल्याने महावितरणसमोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. ग्राहकांनी वीजबिल भरावे, यासाठी कामगार संघटना मदतीला धावल्या आहेत. त्यांनी आपले महावितरण आपली जबाबदारी या अंतर्गत प्रचार मोहीम हाती घेतली आहे. याच दरम्यान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीजबिले भरणाऱ्या भाजपा आमदारांचे आभार असं म्हणत ऊर्जामंत्री राऊत यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून नितीन राऊत यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "वीजबिले योग्य आहेत म्हणून स्वतःची वीज बिले भरणाऱ्या भाजपा आमदारांचे आभार! आपल्याप्रमाणे जनतेला ज्यांना वीज बिल भरायची आहेत, त्यांना ती भरू द्या! आधीच तुम्ही थकबाकीचा डोंगर करून ठेवलाय तो थोडा हलका होऊ द्या" असं राऊत यांनी म्हटलं आहे. टाळेबंदी (लॉकडाऊन) नंतर वीजबिलाच्या थकबाकीचा डोंगर महावितरणसमोर उभा राहिला आहे.
आधी वीजबिल भरा, असे सांगणाऱ्यांची तक्रार करा - ऊर्जामंत्री
आधी वीजबिल भरा, नंतर वीजबिल दुरुस्ती करून देतो, असे अधिकारी सांगत असतील त्यांची तक्रार करा. तक्रार प्राप्त झाल्यास त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या अशा सूचना नाहीत. काही अधिकारी, कर्मचारी जाणूनबुजून अशा पद्धतीची वागणूक देत असतील तर त्यांची तक्रार वेबसाइटवर करा, अशी प्रतिक्रिया काही दिवसांपूर्वी नितीन राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.
लॉकडाऊनमध्ये एकदाही बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या ६४ लाख ५२ हजारांवर
लॉकडाऊन काळात एकदाही बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या ६४ लाख ५२ हजार इतकी आहे. त्यामुळे दैनंदिन संचलन करण्यातही महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे वीजबिल भरणा मोहीम हाती घ्यावी लागत आहे. कोरोना काळात आलेल्या वीजबिलांबाबत सवलत मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण महावितरणने वसुलीसंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. सर्व थकबाकी आणि चालू वीजबिल डिसेंबर २०२० पर्यंत वसूल करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.