पवार यांचे नाव घेतल्याशिवाय कोणत्याच नेत्याला मोठेपणा मिळत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 08:39 PM2019-05-17T20:39:45+5:302019-05-17T20:44:05+5:30
राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा महसुलमंत्र्यांना टोला
सांगोला : शरद पवार यांचा पॉवरच इतका आहे की, राज्यात असेल किंवा देशात असेल त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणालाही मोठेपणा मिळत नाही, असा टोला राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सांगोल्यात लगावला.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलदुष्काळी दौºयावर असताना दुष्काळाविषयी न बोलता पवार कुटुंबीयांवर टीका करतात, याविषयी वाघ यांना विचारले असता त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पत्रकार परिषदेत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, शरद पवार यांच्यावर टीका करण्यापेक्षा सरकारने शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे़ या राज्याला पूर्णवेळ कृषी मंत्री नाही ना सचिव नाही, जो अन्नदाता आहे, त्याच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारला पूर्णवेळ मंत्री देता आला नाही. यावरून सरकारची मानसिकता काय आहे हे कळते, अशी खोचक टीका त्यांनी केली.
आघाडी सरकारच्या काळात आॅगस्ट महिन्यात छावण्या सुरू केल्या होत्या; मात्र राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला शेतकरी, कामगार, कष्टकºयांच्या प्रश्नांशी काहीच देणे-घेणे नाही. उलट भाजप सरकार विधानसभा निवडणुकीच्या मूडमध्ये आहे. छावण्या सुरू होऊन एक महिना झाला तरीही छावणीचालकांना अनुदान मिळाले नाही. छावण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, याचा अर्थ त्यांचा लोकांवर विश्वास राहिलेला नाही.
तरंगेवाडी छावणीत विजेची सोय नाही, खड्ड्यातील गढूळ पाणी जनावरांना व माणसांना प्यावे लागते, ही बिकट अवस्था आहे. अर्धा किलो पशुखाद्य जनावरांसाठी पुरेसे नाही ते वाढवून द्यावे, अशी पशुपालकांची मागणी आहे. शेळ्या-मेढ्यांना जगवण्यासाठी अनुदान मिळावे ही प्रामुख्याने महिलांची मागणी आहे. याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले़