शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर फडणवीस म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 05:24 PM2020-07-28T17:24:30+5:302020-07-28T17:33:18+5:30
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत एकत्र येण्याबद्दल केलेल्या विधानावर देवेंद्र फडणवीस यांचं भाष्य
मुंबई: आगामी काळात शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्याच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहोत. पण निवडणुका वेगळ्या लढू असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलं आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेबद्दल केलेलं विधान देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढलं आहे. 'चंद्रकांत पाटील शिवसेनेसोबत जे बोलले, ते त्यांनी एका प्रश्नाला दिलेलं उत्तर होतं. आम्ही पुढील निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. त्यामुळे आमच्याकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. त्यांच्याकडूनही आम्हाला प्रस्ताव मिळालेला नाही,' असं फडणवीस म्हणाले आहेत.
काल भाजपाच्या कार्यकारणीची बैठक घेतली. त्याबद्दलची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. येणाऱ्या काळात स्वबळावर सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं असं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी सांगितलं. त्यामध्ये आम्ही यापुढे राज्यात कोणतीही निवडणूक एकत्र लढणार नाही, वेगळी लढणार, निवडणुकीनंतर एकत्र येण्यावर चर्चा होईल. मात्र अद्याप ४ वर्ष आहेत. यादरम्यान शिवसेनेच्या बाजूनं प्रस्ताव आला तरी निवडणूक वेगळी लढू, प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व विचार करेल. केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिल्यास आम्ही एकत्रही येऊ,' असं त्यांनी सांगितलं.
सध्या आम्ही प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत, कोरोना काळात जो भ्रष्टाचार सरकारनं केला त्याचा बुरखा फाडणार आहोत. ४ महिन्याच्या कालावधीत जे छुप्या पद्धतीने काम केलं आहे, ते माहिती अधिकारातून बाहेर काढू, आंदोलन करू, प्रमुख आणि प्रबळ अपक्ष १९ आणि भाजपा १०५ मिळून विरोधी पक्षाचं काम करू, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.