ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक आणि इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या विरोधात मनी लाँड्रिंगप्रकरणी विशेष न्यायालयानं अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. अंमलबजावणी संचालनालया(ईडी)च्या याचिकेवर विशेष न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. झाकीर नाईक तपासाला सहकार्य करत नसल्यानं ईडीनं विशेष न्यायालयात झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती. ईडीनं झाकीर नाईक यांना अनेक समन्स बजावले होते. मात्र नाईक यांनी त्याला उत्तर दिलं नाही, अशी माहिती ईडीचे सल्लागार हितेन वेनेगावकर यांनी दिली आहे. ईडीच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान विशेष न्यायालयानं झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं आहे. झाकीर नाईक याला परदेशातून आलेल्या 60 कोटींच्या व्यवहारात ईडीला अनियमितता आढळून आली होती. त्यानंतर चौकशी केली असता हा पैसा नाईकनं हवालामार्फत आणल्याचे ईडीच्या निदर्शनास आलं होतं. तत्पूर्वी झाकीर नाईक याच्या संस्थेवर बंदी घालण्यात आली आहे. संस्थेकडून होणाऱ्या सर्व अवैध कृत्यांचा तपास करण्यात आला असून, या संस्थेवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कारवाई केली आहे.तसेच पीस टीव्ही या आंतरराष्ट्रीय इस्लामिक चॅनेलचा झाकीर नाईकच्या संस्थेशी संबंध असल्याचेही तपासातून निष्पन्न झाले आहे. झाकीरची संस्था पीस टीव्हीसाठी आक्षेपार्ह कार्यक्रमांची निर्मिती करते. तसेच त्यापैकी बरेच कार्यक्रम हे भारतात तयार केले जातात, असेही तपासातून समोर आलं आहे. तरुणांना दहशतवादाकडे वळण्यासाठी प्रेरित करण्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी हे झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित झाल्याचे समोर आल्यानंतर झाकीर नाईक वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
मनी लाँड्रिंगप्रकरणी झाकीर नाईकविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2017 5:54 PM