- सीमा महांगडेमुंबई : अमराठी टॅक्सी-रिक्षाचालकांना मराठी शिकविण्याचे सर्व प्रयत्न अपुरे पडल्यानंतर अमराठी लोकांना मराठी भाषा व संस्कृतीविषयी आस्था निर्माण व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाचा जर्मन भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था यांनी त्यांच्यासाठी पुस्तके तयार केली आहेत. ही पुस्तके मुद्रणाच्या टप्प्यावर आहेत.सरकारने पुढाकार घेऊन आरटीओ कार्यालयांच्या ठिकाणी पुस्तकांची व्यवस्था करून किंवा रिक्षा - आॅटो चालकांचे वर्ग घेऊन त्यांना किमान व्यवसायापुरती मराठी शिकता यावी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत माय मराठी प्रकल्पाच्या सहलेखक आणि सहसंपादक प्रा. सोनाली देशपांडे गुजर यांनी व्यक्त केले.मी ज्या राज्यात राहत आहे, तेथील स्थानिक भाषा किमान स्वरूपात येणे आवश्यक असल्याची गरज मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या प्राध्यापिका व विभाग प्रमुख विभा सुराना यांना झाली तेव्हा त्यांनी २०१२ साली माय मराठी प्रकल्प हाती घेतला. यात संभाषणकौशल्ये, व्याकरण, शब्दसंपदा यावर भर दिला आहे. प्रत्येक पातळीचे पाठ्यपुस्तक, त्यात सराव, खेळ, करा व शिका, संवाद, उतारे, कविता, म्हणी-वाक्प्रचार, कठीण शब्दांचे हिंदी व इंग्रजीत अर्थ, वाक्यात उपयोग, दृकश्राव्य साहित्याची डीव्हीडी उपलब्ध आहे. चार लघू अभ्यासक्रमांत परिचारिका, रिक्षा, टॅक्सीचालक, बँक, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अभ्यासक्रम तयार केला आहे. या प्रकल्पांतर्गत रिक्षा, टॅक्सीचालकांचे वर्ग घेण्यासाठी ४५ ते ५० शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचे गुजर यांनी सांगितले.अक्षरे गिरवता येणारअभ्यासक्रम इंटरनेटवरही उपलब्ध करून दिला जाईल. दहा पातळीमध्ये विभागल्या गेलेल्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. प्ले स्टोअरवर हे अॅप उपलब्ध असून संवाद शिकताना, प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विविध पातळ्याही पार करता येतात. अक्षरे गिरविणे, ध्वनिमुद्रण हेही यात उपलब्ध आहे.
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालक, परिचारिकांसाठी विद्यापीठाच्या जर्मन विभागाकडून मराठीचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 4:45 AM