नागपूर - त्यामध्ये राज्यातील राजधानीपासून दूरच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवता याव्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. आता प्रत्येक विभागात सीएमओ अर्थात मुख्यमंत्र्यांचे कार्यालय स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाला संबोधित करताना विदर्भाच्या विकासासह अन्य काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी सीएमओबाबतही उद्धव ठाकरे यांनी एक मोठी घोषणा केली. ''या राज्यातील विविध भागात राहणारे नागरिक आपल्या समस्या घेऊन मंत्रालयाकडे धाव घेत असतात. या लोकांना मंत्रालयात आल्यावर मंत्र्यांना कसे भेटायचे, मुख्यमंत्र्यांकडे कसे जायचे हे कळत नाही. ते गोंधळून जातात. त्यामुळे अशा लोकांना मंत्रालयाचे हेलपाटे मारावे लागू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात सीएमओ कार्यालय सुरू करण्याचा आमचा मनोदय आहे. मात्र सुरुवातीला प्रत्येक विभागात सीएमओचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे काहीसे सत्तेचे विकेंद्रिकरण होणार असले तरी ते आवश्यकच आहे.
आता प्रत्येक विभागात सीएमओ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 4:24 PM