आता शास्त्रीय, लोककला, चित्रकलेसाठी वाढीव गुण
By Admin | Published: January 8, 2017 04:06 AM2017-01-08T04:06:47+5:302017-01-08T04:06:47+5:30
शास्त्रीय कला, लोककला आणि चित्रकलेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मार्च २0१८ पासून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण
मुंबई : शास्त्रीय कला, लोककला आणि चित्रकलेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मार्च २0१८ पासून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने शनिवारी घेतला. कोणत्या कलेसाठी हे वाढीव गुण दिलेले आहेत, त्याचा उल्लेख गुणपत्रिकेवर असेल.
१0 वर्षे अस्तित्वात असलेल्या, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या व तीन वर्षांचा लेखा अहवाल सादर केलेल्या संस्थातून शास्त्रीय कलेची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील अतिरिक्त गुण देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. ज्या संस्थांची नोंदणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असेल, त्या संस्थेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्याने प्राप्त केलेले असल्यास, विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ते तपासून प्रमाणित करण्यात येईल. सर्व प्रकारच्या वाढीव गुणांचा विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी फायदा होईल.
शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन यामध्ये या विद्यार्थ्याने कमीत कमी पाच वर्षांचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेले असावे. मान्यताप्राप्त संस्थांच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास, दहा गुण व पाच परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास १५ गुण देण्यात येणार आहेत. या परीक्षा इयत्ता दहावीपर्यंत कधीही उत्तीर्ण केल्या तरी चालतील. शास्रीय नृत्य, गायन व वादन प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पारितोषिक/शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास वाढीव २५ गुण दिले जातील. तथापि, अशा विद्यार्थ्यास पहिला निर्णय लागू राहणार नाही.
आठवी, नववी आणि दहावीमध्ये लोककला प्रकारातील किमान ५० प्रयोग सादर केलेले असतील, अशा विद्यार्थ्यास १० गुण, तसेच २५ प्रयोगांसाठी ५ वाढीव गुण देण्यात येणार आहेत. आठवी, नववी आणि दहावीमध्ये राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यास अनुक्रमे १५, दहा आणि पाच गुण वाढीव देण्यात येणार आहेत. पहिलीपासून शालेय स्तरावर कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत अभिनयाचा पुरस्कार मिळविलेल्या विद्यार्थ्यास दहा गुण तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच वाढीव गुण दिले जातील.
चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत ए ग्रेड प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ गुण, बी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना दहा गुण तर सी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना पाच गुण वाढीव दिले जातील. कला क्षेत्रासाठी असणाऱ्या दोन टक्के आरक्षणामध्ये (प्रवेशासाठी) शास्रीय गायन/नृत्य/वादन या कला प्रकारात प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचादेखील समावेश करण्यात येणार आहे.(विशेष प्रतिनिधी)
लोककला अभ्यासक्रम
लोककला क्षेत्रातील अभ्यासक, संस्था व मंडळे यांच्याकडून लोककलांसंदर्भातील अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाची अभ्यास समिती त्यावर शिक्कामोर्तब करेल. या अभ्यासक्रमाच्या चार परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास २० वाढीव गुण आणि तीन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास १५ वाढीव गुण देण्यात येतील.
शास्त्रीय कला, चित्रकला आणि लोककलांची रुजवात शालेय जीवनापासूनच व्हावी, यासाठी प्रोत्साहन म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या कलांना राजाश्रय देण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे.
- विनोद तावडे, शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री