ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - मुंबईतील पहिल्यावहिल्या महिला रिक्षाचालक मुंबईकरांना आपल्या रिक्षातून खास सवारी देत आहेत. छाया मोहिते आणि त्यांची 19 महिलांची टीम सध्या मुंबईतील दाटीवाटीच्या रस्त्यांवरुन प्रवाशांना आपली रिक्षासेवा पुरवत आहेत.
महिलांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकारतर्फे एक विशेष योजना अंमलात आणण्यात आली आहे. या योजनेद्वारे 5 टक्के रिक्षा परवाने महिलांना देण्यात आली आहेत. 19 महिलांपैकी 45 वर्षांच्या असलेल्या छाया मोहिते यांनी आपल्या रिक्षा प्रवासाबाबत सांगितले की, "घरगुती कामं करण्यापेक्षा रिक्षा चालवणं जास्त चांगलं आहे. याद्वारे मला अधिक आर्थिक नफा कमावू शकते आणि यामुळे आमचं भविष्यही सुरक्षित राहील".
छाया मोहिते यांना तीन मुलं आहेत. त्या गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षण केंद्रातून रिक्षा चालवण्याचे धडे घेत आहेत. "एक काळ असा होता की मला साधी सायकल चालवता येत नव्हती. पण आता मी रिक्षा चालवू शकते. मी स्वतंत्र असून ही बाब माझ्यासाठी आनंददायी आहे, असंही त्यांनी सांगितले. दरम्यान, छाया यांनी एका दिवसामागे 1000 रुपये कमावण्याची आशा व्यक्त केली आहे.
रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसोबत अनेक गैरवर्तवणुकीच्या घटना घडतात. त्याचीच दखल घेत महिला प्रवाशांसाठी महिला रिक्षाचालक आणण्याचा निर्णय 2016 घेण्यात आला होता. ही सेवा एमएमआरटीए (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई, विरार, मीरा-भार्इंदर, भिवंडी, उल्हासनगर) क्षेत्रांत सुरू करण्यासाठी एमएमआरटीए प्रयत्नशील असल्याची घोषणाही त्यावेळी करण्यात आली होती. तसंच महिलांना सक्षक बनवण्यासाठीही ही योजना सरकारद्वारे अंमलात आणण्यात आली. मुंबई, ठाण्यापूर्वी देशातील नवी दिल्ली आणि रांची शहरात महिला रिक्षाचालक असलेली सेवा सुरू करण्यात आली आणि त्यासाठी चालकांना ड्रेसकोड देण्यात आला असून, खास महिलांसाठी असलेल्या रिक्षांना रंगही देण्यात देण्यात आला.
मुंबईतील या महिला रिक्षाचालकांना प्रशिक्षण देणारे सुधीर डोईफोडे सांगतात, की "छाया मोहिते आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मी रिक्षा चालवायला शिकवले आहे. त्या आता उत्तम प्रकारे रिक्षा चालवतात व आरिओची परीक्षाही त्या पास झाल्या आहेत". सध्या डोईफोड यांच्याकडे 40 महिला वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. "जेव्हा आम्ही घरगुती कामं सोडून रिक्षाचालक होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी लोकांनी आमची थट्टा केली. मात्र या क्षेत्रात येऊ इच्छिणा-या महिलांसाठी आम्ही प्रेरणा ठरू, ही आशा आहे", अशी प्रतिक्रिया रिक्षाचालक अनिता कर्डक यांनी दिली.
या महिला रिक्षाचालकांसाठी पांढ-या रंगाचा लॅब कोर्ट असा ड्रेस कोड आहे. तर रिक्षाचा रंग नारंगी आणि पिवळा असा आहे.