आता महायुतीचे संयुक्त मेळावे; महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 10:40 AM2023-10-11T10:40:46+5:302023-10-11T10:41:53+5:30
तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे एकत्रित मेळावे राज्यात होणार आहेत.
मुंबई : सत्तारूढ महायुती सरकारमधील तीन पक्षांमध्ये महामंडळे, विधिमंडळ समित्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार भाजपाला ५० टक्के तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी २५ टक्के जागा मिळतील. तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांचे एकत्रित मेळावे राज्यात होणार आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शासकीय बंगल्यावर मंगळवारी बैठक झाली. महायुतीचे सरकार येऊन १५ महिने उलटले तरी विधिमंडळाच्या विविध समित्यांचे सदस्य अध्यक्ष अद्याप निश्चित झालेले नाहीत. आजच्या बैठकीत ही नावे निश्चित करण्यात आली. समित्यांच्या सदस्यांमध्ये केवळ सत्तारूढ पक्षाच्या आमदारांचा समावेश न करता विरोधी पक्षाच्या सदस्यांनाही स्थान देण्याची भूमिका घेण्यात आली.
आजच्या बैठकीला चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, तसेच छगन भुजबळ उदय सामंत, दादा भुसे हे मंत्री, तसेच खा. राहुल शेवाळे, मुंबई भाजप अध्यक्ष आ. आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आशिष कुलकर्णी आणि समन्वय समितीचे संयोजक आ. प्रसाद लाड उपस्थित होते.
बैठकीत ठरले....
- प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चार-चार प्रमुख नेत्यांची एक समिती लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने नेमली जाईल.
- भाजपच्या मित्र पक्षांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी या समितीत असतील.
- लहान मित्र पक्षांचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये त्यांना स्थान दिले जाईल. या समित्यांच्या नियमित बैठका होतील.