लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानासाठीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. मात्र राज्यातील मुख्य विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाला अद्याप अंतिम रूप आलेलं नाही. दरम्यान, महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबईत झाली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीने केंद्रातील मोदी सरकारविरोधात एक महत्त्वाची घोषणी दिली. ‘’बस हुई महंगाई की मार, अब क्यूं चाहीए मोदी सरकार?’’, असं घोषवाक्य मविआनं दिलं आहे.
दरम्यान, या बैठकीनंतर माहिती देताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये मतदारांसमोर कुठले मुद्दे मांडले पाहिजेत. कुठल्या मुद्द्यावर भर दिला पाहिजे. प्रचारातील मुद्दे हे सकारात्मक असावेत, नकारात्मक मुद्दे शक्यतो टाळले पाहिजेत, यावर उहापोह झाला. तसेच ‘’बस हुई महंगाई की मार, अब क्यूं चाहीए मोदी सरकार?’’, असं मोदी सरकारविरोधातील घोषवाक्यही या बैठकीत निश्चित करण्यात आलं.
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत अंतिम तोडगा निघालेला नाही. शिवसेना ठाकरे गटाने आपले १७ उमेदवार घोषित केले आहेत. मात्र यातीलर सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत. त्यामुळे आता जागावाटपावर काय तोडगा निघतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.