‘न्यूड’ चित्रपटावरून मराठी चित्रसृष्टीत पडले दोन गट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 03:20 AM2017-11-16T03:20:52+5:302017-11-16T03:21:53+5:30
प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ चित्रपट गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) वगळल्याच्या निषेधार्थ मराठी चित्रसृष्टीने इफ्फीवर बहिष्कार टाकावा, असे मत काही अभिनेते, दिग्दर्शकांकडून व्यक्त होत असताना, दुसरीकडे
पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ चित्रपट गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) वगळल्याच्या निषेधार्थ मराठी चित्रसृष्टीने इफ्फीवर बहिष्कार टाकावा, असे मत काही अभिनेते, दिग्दर्शकांकडून व्यक्त होत असताना, दुसरीकडे काही दिग्दर्शकांनी महोत्सवात सहभागी होणार असल्याची भूमिका घेतल्याने या मुद्द्यावरून मराठी चित्रसृष्टीत दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या वादावर योगेश सोमण म्हणाले, वर्षापूर्वी ‘माझं भिरभिरं’ हा चित्रपट बनवला. मला इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याची संधी या चित्रपटामुळे मिळाली आहे. त्यामुळे मी महोत्सवात सहभागी होणार आहे. दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, सर्व दिग्दर्शकांनी एकत्र येऊन भूमिका घेतल्यास सरकारवर दबाव येईल आणि वगळलेल्या दोन्ही चित्रपटांचा पुन्हा महोत्सवात समावेश करणे शक्य होईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सहन करणे अयोग्य आहे. सुमित्रा भावे म्हणाल्या, ‘नऊ मराठी सिनेमांच्या निर्माते, दिग्दर्शकांनी एकत्र येऊन एकजुटीने निर्णय घेतल्यास माझाही पाठिंबा असेल. याबाबत मोहन आगाशे योग्य निर्णय घेतील.
हा निर्णय सर्जनशीलतेचा गळा घोटणारा आहे. बहिष्काराऐवजी महोत्सवात सरकारविरोधात आवाज उठवला पाहिजे. ‘मुरांबा’ हा माझा चित्रपटही महोत्सवासाठी निवडला गेला आहे. मुरांबाची टीम महोत्सवात निषेध व्यक्त करणार आहे.
- नितीन वैद्य, दिग्दर्शक, मुरांबा
नग्नता आणि अश्लीलता यातला भेद आपल्याला अजून कळायला तयार नाही. संस्कृती नावाच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक. यांचा संस्कृतीचा, इतिहासाचा धड अभ्यास नाही आणि उचित, तर्कशुद्ध विचार करण्याची कुवतही नाही. - कविता महाजन