मयुरी चव्हाण, लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: मंगळवारी कल्याणमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा वाद चांगलाच विकोपाला गेलेला पाहायला मिळाला. मात्र अजूनही या वादाची धग संपली नाहीये. भाजप शहर कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडून तर शिवसेनेच्या या तोडफोडीचा एकहाती विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा भाजपने आज सत्कार केला. त्यामुळे आगामी काळात एकमेकांविरोधात लढण्यासाठी आपण सज्ज आहोत हे दोन्ही पक्षांनी दाखवून दिलंय.या पार्श्वभूमीवर एकीकडे दोन्ही पक्षातील वरिष्ठ मंडळी चमकोगिरी करत असताना स्थानिक पातळीवर फारसे प्रसिद्धीझोतात नसलेलं पदाधिकारी- कार्यकर्तेच खरे हिरो ठरले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच्या वक्तव्यानंतर कल्याणात देखील वातावरण चांगलचं तापलं होतं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट भाजप शहर कार्यालयावर धडक देत कार्यालयाच्या काचा फोडल्या. यावेकी विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. शिवसेनेचे अमोल गायकवाड यांनी आपल्या हातानेच कार्यालयाची काच फोडली. याबद्दल मंगळवारी शिवसेनेच्या कल्याण शहर मध्यवर्ती शाखेत महानगरप्रमूख विजय साळवी, उपशहर प्रमूख हर्षवर्धन पालांडे आदी सेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमोल गायकवाड यांचा सेनेने सत्कार केला. दरम्यान शिवसेनेच्या या हल्ल्याचा तेथे उपस्थित असलेल्या भाजपच्या केवळ 2 पदाधिकाऱ्यांनी ठामपणे विरोध केला. त्याबद्दल भाजप कल्याण जिल्हा कार्यलयात प्रताप टूमकर आणि वैभव सावंत या दोघांचा बुधवारी आमदार गणपत गायकवाड, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
पक्ष कोणताही असो स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशिवाय पक्षाला शोभा नाही तेच खरं! जेव्हा जेव्हा पक्ष संकटात असतो तेव्हा ग्राउंड लेव्हलवर ही मंडळी लागलीच पुढे सरसावतात .मग वेळ पडली तर पोलिसांच्या पाठीवर पडलेल्या काठ्या असो किंवा दाखल होणारे गुन्हे असो पक्षासाठी सर्व काही करायला पदाधिकारी तयार असतात. कल्याणात दोन्ही पक्षांनी आपापल्या पदाधिकारी-यांचा सन्मान केला..मात्र एकामागोमाग एक घडणाऱ्या नाट्यमय राजकीय घडामोडीमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या येत्या निवडणूकीत प्रामुख्याने कार्यकर्ते- पदाधिकारी चांगलेच भिडणार हे नक्की.