आमदार कदमांकडून अधिकाऱ्यांना शिव्या
By admin | Published: January 24, 2015 01:45 AM2015-01-24T01:45:55+5:302015-01-24T01:45:55+5:30
मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे सलग दुसऱ्या दिवशी वादाच्या भावऱ्यात अडकले आहेत.
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे सलग दुसऱ्या दिवशी वादाच्या भावऱ्यात अडकले आहेत. गुरुवारी तलाठ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर, शुक्रवारी जाहीर भाषणात प्रशासनातील अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहतानाच जनसमुदायाला पोलिसांना चपला दाखवायला लावल्या़
‘आधी रस्ते मग वाळू’ अशी घोषणा देत कदम यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. एका टेम्पोच्या टपावर बसून प्रक्षोभक घोषणा देत प्रशासनाचा ‘उद्धार’ करीत होते़ जिल्हा परिषदेच्या गेटवर जाहीर सभेत बोलताना त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना लक्ष्य केले़ या वक्तव्यांमुळे माझ्यावर अनेक गुन्हे दाखल होणार असले तरी मी घाबरत नाही़ मी जेलमध्ये जाण्यास तयार आहे़ आमदारकी गेली तर घरी बसेन, मात्र अधिकाऱ्यांना सोडणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली़ हातात बांबू घ्या आणि पोलिसांची, जिल्हाधिकाऱ्यांची गाडी गावात आली तर त्यांना बाबू दाखवा, असे फर्मान कदम यांनी या वेळी सोडले़
तलाठी मारहाणप्रकरणी जामीन
तलाठ्यास मारहाण केल्याप्रकरणी रमेश कदम यांना जामीन मंजूर झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे कदम यांनी तलाठ्यास मारहाण केली होती. या प्रकरणी प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आ. कदम यांच्यावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.