मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ‘ओखी’ या चक्रीवादळात झाले आहे. श्रीलंकेजवळ निर्माण झालेले हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. येत्या २४ तासांत चक्रीवादळाचा वेग आणि प्रभाव वाढणार असला तरी गोव्यासह महाराष्ट्रातील मुंबई आणि उर्वरित किनारपट्टी क्षेत्राला ‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका तुर्तास तरी नाही, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या नियंत्रण कक्षाने दिली.गुरुवारी हे चक्रीवादळ कन्याकुमारीच्या दक्षिणेपासून ६० किलोमीटर, त्रिवेंद्रमपासून १२० किलोमीटर अंतरावर नोंदविण्यात आले आहे. पुढील २४ तासांत चक्रीवादळाचा प्रभाव आणि वेग आणखी वाढणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अरबी समुद्रातील वातावरण हे चक्रीवादळास अनुकूल असल्याने त्याचा प्रभाव आणखी वाढणार आहे. दक्षिण भारतातील काही भागांना चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय येथे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, चक्रीवादळाचा प्रभाव वाढत असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.थंडीचा जोर वाढतोय...राज्यासह मुंबईत थंडीचा जोर कायम आहे. गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १६.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान भिरा येथे १०.५ अंश नोंदविण्यात आले आहे. राज्याचा विचार करता विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. तर येत्या ४८ तासांसाठी मुंबईचे किमान तापमान १८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी येथे पडलेली थंडी मुंबईकरांना आणखी हुडहुडी भरवणार आहे.सध्या पहाटेच्या वेळी मुंबईत गारवा असतो. दुपारी उकाडा असला तरी संध्याकाळनंतर पुन्हा गारवा सुरू होतो. काही दिवसांनी या गारव्यात वाढ होत जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
‘ओखी’ चक्रीवादळाचा धोका नाही, हवामान खात्याचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 6:12 AM