- अतुल कुलकर्णीमुंबई : गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन शिक्षणाचा राज्यात पुरता बोजवारा उडाला आहे. शिक्षण विभागाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात पहिली ते बारावीच्या १,६१,९९,४९० मुलांकडे स्मार्टफोन नाही, तर राज्यातील २८,२६,४४२ मुलांकडे मोबाइल, रेडिओ अथवा टीव्ही, असे काहीच नाही. अनेक गावांत नेटवर्क मिळत नसल्याने आॅनलाइन शिक्षण हवेतच आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणत अनाकलनीय व तर्कहीन प्रकल्प राबविण्याच्या घोषणा सरकारकडून होत आहेत. तांत्रिक समज नसलेल्या शिक्षण अधिकाऱ्यांकडून येणा-या कल्पना गृहीत धरून टीव्ही चॅनलवरून शिक्षणाची घोषणा केली गेली; पण पाच महिने झाले तरी अजून सह्याद्री चॅनलसोबत लेखी करारदेखील झालेला नाही. यावर कडी म्हणजे एससीईआरटी संस्थेने परस्पर एमकेसीएलसोबत करार न करता सह्याद्री वाहिनीवरून विद्यार्थ्यांसाठी तासिका चालू केल्या आहेत. राज्यात दहावीचे १८,०३,६२६ विद्यार्थी आहेत. बालभारतीचे अॅप मोफत असूनही त्यापैकी फक्त ५० हजार विद्यार्थ्यांनीच ते डाउनलोड केले आहे.
अनेक गावांत नेटवर्क मिळत नाही. काही गावांत मुले झाडावर चढून नेटवर्क मिळते का ते पाहतात, तर काही ठिकाणी गच्चीवर जाऊन नेटवर्क शोधणे सुरू आहे. याबद्दल शिक्षण विभागाचे माजी संचालक आणि एसव्हीकेएम संस्थेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन आवटे म्हणाले की, आपण जे काही शिकवत आहोत, त्याकडे शिकणा-या मुलांचे लक्ष आहे का, पर्यायी शिकवण्याची निवडलेली पद्धती योग्य आहे का, याद्वारे जे शिकवले जात आहे, ते योग्य आहे का, या तीनही प्रश्नांवर आॅनलाइन शिक्षण पूर्णपणे अपयशी ठरले आहे, तर आ. कपिल पाटील म्हणाले की, ग्रामीण भागात फक्त ३० टक्के आणि शहरी भागात ५० टक्के आॅनलाईन शिक्षण मिळत आहे. त्यामुळे शालेय वर्ष जानेवारी ते डिसेंबर करावे आणि उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्या रद्द करून दोन वर्षे एकत्र करावीत, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.
पहिली ते बारावीचे राज्यातील विद्यार्थी : २,२३,५६,०३३स्मार्ट फोन असणारे विद्यार्थी : ६१,५६,५४३स्मार्ट फोन नसणारे विद्यार्थी : १,६१,९९,४९०रेडिओ असणारे विद्यार्थी : २१,८८,९५०काहीच नसणारे विद्यार्थी : २८,२६,४४२सरकारी शाळेतील दहावीचे विद्यार्थी : १,१२,१६०खाजगी अनुदानित शाळेतील दहावीचे विद्यार्थी : १३,२४,९१३खाजगी विनाअनुदानित शाळेतील दहावीचे विद्यार्थी : ३,६३,७९१राज्यातील एकूण शाळा : १,०९,९४२