चाकण : येथील एमआयडीसीतील कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करणारे व शेतकरी भूमिपुत्र दत्तात्रय येळवंडे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश नाम फाउंडेशनसाठी सिनेकलाकार सिद्धार्थ जाधव यांच्याकडे सुपूर्त केला.श्रमिक एकता महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात महासंघाच्या वतीने दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते, त्यातून पंचवीस हजार रुपये जमा झाले होते. जमा झालेल्या रकमेत महासंघाचे उपाध्यक्ष येळवंडे यांनी स्वत:चे पंचाहत्तर हजार रुपये टाकून एकूण एक लाख रुपयांचा धनादेश नाम फाउंडेशनला दिला.फाउंडेशनच्या वतीने धनादेश स्वीकारण्यासाठीनाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे सहकारी सिनेकलाकार सिद्धार्थ जाधव उपस्थित होते.येळवंडे निघोजे या गावातील शेतकरी कुटुंबातील असून घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेता न आल्याने कामगार म्हणून जीवनाची वाटचाल करीत असताना आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून समाजकार्य करीत असतात. विशेषकरून कामगार क्षेत्रात कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. याप्रसंगी श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, लॉरिअल युनियनचे अध्यक्ष अविनाश वाडेकर, हुंदाई युनियनचे अध्यक्ष साहेबअण्णा गोविंदे, अंकुश गायकवाड, ज्ञानोबा कांदे आदी उपस्थित होते.
कामगारांचे ‘नाम’ला एक लाख
By admin | Published: May 19, 2016 2:00 AM