‘ऑनलाइन गेमर्स’ आयकरच्या रडारवर, तीन वर्षांत ५८ हजार कोटी जिंकले; कर भरण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 09:42 AM2022-09-06T09:42:07+5:302022-09-06T09:45:36+5:30
गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांनी विविध ऑनलाइन गेम्स सादर केले आहे. तसेच त्या खेळांकडे आकृष्ट करण्यासाठी हे खेळ जिंकणाऱ्या ग्राहकांना घसघशीत बक्षिसे देण्याची घोषणादेखील करण्यात येत आहे.
मुंबई : वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे ऑनलाइन गेम खेळत पैसे कमाविणारे ‘खेळाडू’ आता आयकर विभागाच्या रडारवर आले असून, या लोकांनी बक्षिसापोटी मिळविलेली रक्कम स्वतःहून जाहीर करत त्यावर लागू असलेला कर भरणा करावा, अन्यथा त्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिला आहे. गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन गेमच्या माध्यमातून तब्बल ५८ हजार कोटी रुपयांच्या रकमेचे वितरण बक्षिसापोटी झालेले असल्याची माहिती केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला दिली असून, त्या अनुषंगाने आता मंडळाने हा कारवाईचा इशारा दिला आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांनी विविध ऑनलाइन गेम्स सादर केले आहे. तसेच त्या खेळांकडे आकृष्ट करण्यासाठी हे खेळ जिंकणाऱ्या ग्राहकांना घसघशीत बक्षिसे देण्याची घोषणादेखील करण्यात येत आहे. ऑनलाइन गेम्स प्रकारावर कंपन्यांना जीएसटी भरावा लागतो. तर जे ग्राहक या खेळातून बक्षिसापोटी पैसे मिळवतात, त्या रकमेवर ३० टक्के कराची आकारणी करण्याची तजवीज आयकर कायद्यामध्ये आहे.
मात्र, ऑनलाइन गेम्स खेळणाऱ्या लाखो लोकांनी बक्षिसे जिंकूनही कर भरणा केला नसल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यातच केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन गेम्सच्या माध्यमातून बक्षिसापोटी तब्बल ५८ हजार कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे. मात्र, ऑनलाइन गेमिंग कंपन्यांचा आर्थिक व्यवहार, त्याद्वारे त्यांच्याकडून भरला गेलेला जीएसटी आणि बक्षिसांचे केलेले वितरण आणि त्याद्वारे खेळाडूंकडून अपेक्षित असलेला आयकर याचा मेळ बसत नसल्यामुळे लाखो लोकांनी कर चुकवेगिरी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर, आता आयकर विभागाने ऑनलाइन गेम्स खेळणाऱ्या लोकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. देशात सुमारे ८० लाख लोक नियमित ऑनलाइन गेम खेळतात.
किती आणि कसा कर भरावा लागेल ?
- ऑनलाइन गेमिंगद्वारे मिळालेल्या रकेमवर ३० टक्के कर आकारणी आहे.
- ज्यांनी नियमित विवरणात याची माहिती दिलेली नाही, अशा लोकांना आता ३० टक्के करासोबत २५ टक्के रक्कम दंडापोटी भरावी लागेल.
- ऑनलाइन गेम खेळणाऱ्या लोकांना आयटीआर- यू अर्थात आयकराचे अपडेटेड विवरण भरून त्याद्वारे ऑनलाइन गेमिंगमधून मिळालेल्या पैशाची माहिती द्यावी लागेल. तसेच, अनुषंगिक करभरणा करावा लागेल.