पुणे : कोरोनाच्या महामारीमुळे माणसाच्या वाट्याला आलेली हतबलता, नैराश्य आणि विस्कळीत सार्वजनिक जीवन या पार्श्वभूमीवरही जगभर माणसे विविध मार्गांनी सभोवतालच्या परिस्थितीशी झुंजत आहेत, संशोधन करत आहेत, एकमेकांना सहाय्य करीत आहेत. मानवी व्यवहारांचे, भावभावनांचे, अंत:र्मनातील कोलाहलांचे, अंगभूत माणुसकीचे दर्शनही यानिमित्ताने घडत आहे. आपल्या सभोवतालचे वास्तव कथा, कविता रूपात शब्दबद्धही होत आहे. या अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी विश्व मराठी परिषदेने कथा, कविता लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे. देश- परदेशातील व्यक्तींनी त्यांच्या रचना ई-मेलद्वारा पाठविण्याचे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने प्रा. क्षितिज पाटुकले व अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी भारतातील मराठी भाषिक आणि भारताबाहेरील मराठी भाषिक असे दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत. कोविड युद्धात भारतातील आणि भारताबाहेरील परिस्थिती भिन्न आहे. साहजिकच अनुभवांमध्ये फरक असणार आहे. त्याचे प्रतिबिंब स्वतंत्रपणे दृष्टीक्षेपास यावे म्हणून दोन स्वतंत्र गट करण्यात आले आहेत, असे प्रा. कपाटुकले यांनी नमूद केले आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून कथा, कविता ह्या युनिकोड फॉन्टमध्ये टाइप करून २८ मे २०२० पर्यंत sampark@vmparishad.org या ई-मेलवर पाठवायच्या आहेत. निवड झालेल्या लेखनाला रोख बक्षिसे दिली जाणार असून प्रत्येक सहभागी लेखकाला प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. निवडक कथा आणि कवितांच्या संग्रहांची दोन स्वतंत्र पुस्तके देखील प्रसिद्ध केली जातील.
परीक्षण समितीचे समन्वयक विनोद कुलकर्णी हे असून कथालेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कथाकार भारत सासणे, मोनिका गजेंद्रगडकर, बबनराव पोतदार, निलिमा बोरवणकर आणि कविता लेखन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून राजन लाखे , हिमांशु कुलकर्णी, म.भा. चव्हाण आणि अंजली कुलकर्णी काम पाहणार आहेत. या उपक्रमाचे मार्गदर्शक डॉ. श्रीपाद जोशी असून स्पर्धेचे संयोजक म्हणून अनिल कुलकर्णी हे काम पाहणार आहेत. भारताबाहेर प्रचिती तलाठी - दुबई, अश्विन चौधरी - कॅनडा, निखिल कुलकर्णी - सॅन होजे- अमेरिका, विजय पाटील - अमेरिका, अर्जुन पुतलाजी - मॉरिशस, सुहास जोशी - ऑस्ट्रेलिया, नोहा मससील - इस्राएल, आणि संतोष कदम -ओमान हे विश्व मराठी परिषदेचे प्रतिनिधी असतील. अधिक माहितीसाठी www.vishwamarathiparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.