"आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा, चंद्रकांत हंडोरे सर्वाधिक मतांनी विजय होणार" - नाना पटोले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:39 PM2024-02-15T16:39:56+5:302024-02-15T16:40:24+5:30
Nana Patole News: राज्यसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपासह सर्व मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. काँग्रेसचे आमदार गैरहजर असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत, त्यात काही तथ्य नाही. राज्यसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधान भवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे अजय चौधरी व काँग्रेस पक्षाचे आमदार उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे आमदार गैरहजर असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत, त्यात काही तथ्य नाही. तीन-चार आमदार आले नाहीत, त्यांच्याशी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माझी फोनवर चर्चा झाली आहे व त्यांनी परवानगीही घेतली आहे, वैयक्तिक कारणामुळे ते आलेले नाहीत. मविआला चिंता करण्याची गरज नाही, आमचा एकच उमेदवार आहे आणि तो बहुमताने निवडून येणार आहे. काँग्रेस सरकार अथवा मविआ सरकार असताना विरोधी पक्षांशी चर्चा करून सामोपचारातून बिनविरोध निवडणुका होत होत्या, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे परंतु भाजपाकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा आलेला आहे त्यातून ते निवडणुकीचे राजकारण करत आहेत, असे पटोले म्हणाले.