"विरोधकांना ठाकरे नावाचीच अॅलर्जी; काही लोक अस्तित्वासाठी लढत आहेत!"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 03:40 PM2020-08-13T15:40:59+5:302020-08-13T16:31:26+5:30
ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा भाजपाला टोला, राणेंवर निशाणा!
पुणे : राजकारणामध्ये किती वर्ष आहे, यापेक्षा त्यामध्ये गुणवत्ता किती आहे हे पाहायला हवे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या पद्म पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात काहीच वावगे नाही. मात्र ,विरोधकांना ठाकरे नावाचीच अॅलर्जी असल्याने ते टीका करत आहेत. तसेच काही लोक स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत आहेत. अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ’ पद्म ' पुरस्कार समितीच्या अध्यक्षपदी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीला विरोध करणाऱ्या भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.
केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करण्यासाठी राज्यात लवकर तज्ज्ञांती कृती समिती स्थापन केली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. धोरणातील विविध तरतुदींची अंमलबजावणी व बदल करण्याबाबत पुढील एक-दोन महिन्यात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मिती निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर दिला जाणार आहे. स्वतंत्र कोकण विद्यापीठ करण्यास तेथील अनेकांचा नकार आहे. त्यामुळे विद्यापीठांची उपकेंद्र चांगल्याप्रकारे विकसित केली जातील. त्याअनुषंगाने शैक्षणिक धोरणाचाही आधार घेतला जाईल. तज्ज्ञ समिती त्यावर अभ्यास करेल, असे सामंत यांनी नमुद केले.
महाविद्यालये बंद असून दुसऱ्या वर्षापर्यंतच्या परीक्षाही होणार नाहीत. त्यामुळे जिम, प्रयोगशाळा, ग्रंथालये बंद आहेत. देखभाल-दुरूस्तीचाही खर्च नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये. तसेच प्रवेश शुल्कामध्येही या बाबींचा समावेश न करता केवळ शिक्षण शुल्क घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये. याबाबत बैठक घेणार असून आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
-------------
औरंगाबादमध्ये औषधनिर्मिती विद्यापीठ
औरंगाबादमध्ये औषधनिर्मितीशास्त्र संबंधी स्वतंत्र विद्यापीठ सुरू केले जाणार आहे. त्यासाठी २५ ते ३० एकर जागा देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. केंद्र शासनाकडे प्रस्तावही गेला आहे. पण त्याचा पाठपुरावा होत नाही. त्यामुळे या प्रस्तावासह केंद्र शासनाकडे गेलेल्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली.
-------------