एमपीएससीला समाजाचा विरोध चुकीचा; छावा संघटनची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 02:34 AM2020-10-09T02:34:30+5:302020-10-09T02:34:44+5:30
आंदोलनात एमपीएससी परीक्षेला विरोध होत आहे. मात्र हा विरोध चुकीचा असून, समाज बांधवांनी एमपीएससी परीक्षेला विरोध करू नये, अशी भूमिका अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी घेतली.
लातूर/पुणे : मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वेगळ्या स्तरावर आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात एमपीएससी परीक्षेला विरोध होत आहे. मात्र हा विरोध चुकीचा असून, समाज बांधवांनी एमपीएससी परीक्षेला विरोध करू नये, अशी भूमिका अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी घेतली.
छावा संघटनेची बैठक गुरुवारी लातूर येथे झाली. मराठा समाजाने दुसऱ्या समाजावर अन्याय करून आम्हाला आमच्या मागण्या मान्य करा, असे कधीही म्हटलेले नाही. हा समाज कायम मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन वाटचाल करणारा समाज आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षेला विरोध करणे चुकीचे आहे. इतर जाती-धर्मातील विद्यार्थ्यांचे नुकसान तसेच मराठा समाजातील उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांचेही यात नुकसान आहे. त्यामुळे परीक्षेला विरोध करू नये. सरकारच्या नोकरभरतीला विरोध करावा, असे जावळे यांनी म्हटले आहे.
संभाजीराजेंची भूमिका दुटप्पी;
संभाजी ब्रिगेडचा आरोप
राज्यसभेत २०१८ मध्ये मंजूर झालेल्या १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे मागासवर्ग आयोगाच्या कायद्याने आरक्षणासाठी नवे प्रवर्ग तयार करण्याचे राज्यांचे अधिकार रद्दबातल ठरले. या घटना दुरुस्तीला भाजपचे खासदार युवराज संभाजीराजे यांनी पाठिंबा दिला होता.
तेच संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांसमोर जाऊन आर्थिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी) मराठा आरक्षणाची मागणी करण्याचा दुटप्पीपणा करत आहेत. संसदेत एक भूमिका आणि समाजासमोर त्याच्या विरोधी भूमिका म्हणजे मराठा समाजाची दिशाभूल असल्याची टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. घटनेच्या चौकटीत बसणारे ईडब्लूएसचे आरक्षण मिळावे हा आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.