‘त्या’ सात मद्यधुंद कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचेही आदेश
By Admin | Published: August 2, 2016 03:48 AM2016-08-02T03:48:22+5:302016-08-02T03:48:22+5:30
आॅनड्युटी मद्यपान करणाऱ्या सात जणांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले
कल्याण : आॅनड्युटी मद्यपान करणाऱ्या सात जणांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले आहेत. त्यामुळे आता त्या सात जणांवर लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
केडीएमसीच्या ‘ड’ प्रभागक्षेत्र कार्यालयासमोरील हजेरी शेडमध्ये पालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी आॅनड्युटी मद्यपान करीत असल्याचे सोशल मीडियावर छायाचित्रांसह प्रदर्शित झाले. कल्याण पूर्वेकडील गणेशवाडी परिसरातील एका इमारतीत आठ दिवसांपासून पाणी येत नसल्याने रहिवासी त्रस्त झाले होते. याची तक्रार करण्यासाठी ते ‘ड’ प्रभाग कार्यालयात गेले असता कर्मचाऱ्यांची यथेच्छ दारू पार्टी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी तक्रार करायला आलेल्या रहिवाशांसोबत हुज्जत घातली. आयुक्त रवींद्रन यांनी याची गांभीर्याने दखल घेत पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सात कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्या सात जणांवर लवकरच गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता पाठक म्हणाले की, आयुक्तांच्या आदेशानुसार फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये सचिन चकवे, महेश जाधव, जयप्रकाश शिंदे या तीन कर्मचाऱ्यांसह श्याम सोनवणे, सचिन घुटे, विनयकुमार विसपुते, ज्ञानेश्वर आडके या चौघा कनिष्ठ अभियंत्यांचाही समावेश आहे.
>दुसऱ्यांदा निलंबन
सचिन घुटे हा याआधीच निलंबित होता. आता दुसऱ्यांदा त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
आयुक्त रवींद्रन यांनी सरकारी कार्यालयात मद्यपान करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्याही सूचना केल्या आहेत.