राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीतही भाजपानेमहाविकास आघाडीला धक्का देत, आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. विशेष म्हणजे, भाजपला राज्यसभा निवडणुकीपेक्षाही अधिक मते विधानपरिषद निवडणुकीत मिळाली आहेत. भाजपला राज्यसभा निवडणुकीवेळी पहिल्या पसंतीची १२३ मते मिळाली होती. तर यावेळी तब्बल १३३ पहिल्या पसंतीची मते मिळाली आहे. यासंदर्भात बोलताना विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर समाजासाठी आणि जनतेसाठी आहे, असे म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "महाविकास आघाडीचा काउंटडाऊन पहिल्या दिवसापासूनच सुरू झाले आहे. मात्र, मी एकच गोष्ट सांगतो, की आमचा संघर्ष सत्तेसाठी नाही, आमचा संघर्ष समाजासाठी आणि जनतेसाठी आहे. यावेळी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, तुम्हाला कुणाची मते किती फुटलेली दिसतात, हे तुमचे कयास आहेत. या ठिकाणी जी सत्यता आहे. ती केवळ आम्हालाच माहीत आहे. सर्व पक्षातल्या त्या आमदारांचे मी आभार मानतो आणि अपक्षांचेही आभार मानतो, की त्यांनी आमचे पाचही उमेदवार निवडून आणले.
महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी, सरकारवर आमदारांचा विश्वास नाही -आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत १२३ मते मिळवली होती. आता आम्ही १३४ मते घेतली आहेत. मी आधीपासूनच सांगत होतो. की महाविकास आघाडीत प्रचंड नाराजी आहे, समन्वय नाही. सरकारवर आमदारांचा विश्वास नाहीय. म्हणून आपल्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून आमच्या पाचव्या उमेदवाराला आमदार मते देतील आणि तेच येथे बघायला मिळाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
पाचव्या उमेदवराकरता आमच्याकडे एकही मत नव्हते, तरीही आम्ही काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा अधिक मते घेतली. तसेच उरलेलेल्या चारही उमेदवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात मते घेतली आणि एक प्रचंड मोठा विजय येथे झाला. यावेळी, माझे सहकारी, लक्षण जगताप आणि मुक्ता टिळक येथे आल्या आणि त्यांनी या विजयाला हात भार लावला, मी त्यांचे आभार मानतो, असेही फडणवीस म्हणाले.
या सरकारच्या संदर्भातला असंतोष आता बाहेर आला -आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या प्रमाणे भारताला परिवर्तित करत आहेत, भारताचा विकास करत आहेत. आज महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि या निवडणुकीने महाराष्ट्रात एक नवीन परिवर्तवाची नांदी आपल्याला पाहायला मिळत आहे. मला असे वाटते, की कुठे तरी या सरकारच्या संदर्भातला असंतोष आता बाहेर आला आहे. राज्यात जोवर लोकाभीमुख सरकार येत नाही, तोवर आमचा संघर्ष असाच सुरूच राहील, असेही फडणवीस म्हणाले.