आमची कामे होत नाहीत !

By admin | Published: June 11, 2015 01:50 AM2015-06-11T01:50:11+5:302015-06-11T01:50:11+5:30

शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असूनही कामे होत नाहीत, ही आमच्या आमदारांची तीव्र भावना आहे. साध्या बदल्या अन् प्रशासनाशी संबंधित कामांमध्येही त्यांना

Our works do not work! | आमची कामे होत नाहीत !

आमची कामे होत नाहीत !

Next

मुंबई : शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असूनही कामे होत नाहीत, ही आमच्या आमदारांची तीव्र भावना आहे. साध्या बदल्या अन् प्रशासनाशी संबंधित कामांमध्येही त्यांना विश्वासात घेतले जात नाही, अशी कैफियत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली.
उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्यमंत्री संजय राठोड, दीपक केसरकर आणि दादा भुसे या मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची दोन तास बैठक झाली. दोन दिवसांपूर्वी विधान भवनात झालेल्या बैठकीत आमदारांची कामे होत नसल्याबद्दल तीव्र भावना व्यक्त करण्यात आली होती. आपलीच कामे होत नसतील तर सरकारमध्ये राहायचे कशाला, असा सवालही आमदारांनी केला होता.
या भावनेचे पडसाद मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकतही उमटले. सूत्रांनी सांगितले की मंत्रालयातील सचिव, अन्य अधिकारी तालुक्यापर्यंतच्या कामांचे आदेश स्वत:च्या अधिकारात अन् आमदारांना विश्वासात न घेता काढत आहेत. अधिकारी डोईजड होणार असतील तर त्यांना वेसण घालणे आवश्यक आहे, अशी भावना सेना मंत्र्यांनी व्यक्त केली. आमदारांचा मान राखला जाईल, त्यांच्या मतदारसंघात त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जिल्हा, तालुकास्तरीय समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये शिवसेनेला डावलू नये. शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील ६० टक्के नियुक्त्या शिवसेनेच्या कोट्यातून व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या सगळ्या तक्रारी आणि महामंडळ, समित्यांवरील नियुक्त्या आदी विषयांबाबत भाजपा-शिवसेना समन्वय समितीची बैठक येत्या दोन-तीन दिवसांत घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू आणि समन्वय समितीची लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.
(विशेष प्रतिनिधी)

Web Title: Our works do not work!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.