पालघर – महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात मोखाडा येथे माणुसकीला लाजिरवाणी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका बापानं मुलाच्या कफनची किंमत स्वत: जीव देऊन चुकवावी लागली आहे. जीवघेण्या मजुरीला कंटाळून आत्महत्या करण्याचं हे प्रकरण सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आहेत. घटनेच्या जवळपास १ महिन्यानंतर पोलिसांनी विविध कलमातंर्गत या प्रकरणात गुन्हा नोंद केला आहे.
या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टानं आरोपीची जामिनावर सुटका केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. मोखाडा गावातील रहिवासी काळू धर्मा पवार हा कुटुंबासह गावात वास्तव्य करतो. नोव्हेंबर २०२० मध्ये काळू धर्मा पवार यांचा १४ वर्षीय मुलगा दत्तू पवारनं कातकरी वाडी गावातील एका डोंगरावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
काळू पवारच्या घरची परिस्थिती इतकी बिकट होती की, मुलाच्या अंत्यविधीसाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी काळूनं त्याच्याच गावातील रामदास अंबू कोरदे यांच्याकडून ५०० रुपये उधारी म्हणून घेतले. याच पैशानं काळूनं स्वत:च्या मुलावर अंत्यसंस्कार केले. मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर जेव्हा काळूनं रामदास यांचे पैसे परत केले नाहीत. तेव्हा त्याने काळूला घरी मजुरी करण्यास बोलावले. रामदास सकाळपासून रात्रीपर्यंत काळूकडून काम करुन घ्यायचा. या कामाच्या मोबदल्यात काळूला केवळ एकवेळचं जेवण दिलं जायचं.
काळू पवारनं त्याच्या मेहनतीचं पैसे मागितले तेव्हा रामदासनं त्याचा मानसिक आणि शारिरीक छळ सुरु केला. त्यामुळेच काळूनं १३ जुलैला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा आणि पतीच्या मृत्यूनंतर आता काळूची पत्नी सावित्री हिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. न्यायासाठी ती पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवत आहे परंतु कुणीच पोलीस तिच्या मदतीसाठी पुढे येत नाही. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर २२ ऑगस्टला आरोपी रामदास कोरडे याच्यावर कारवाई करुन त्याला अटक करण्यात आली. २३ ऑगस्टला त्याला कोर्टात हजर केले तेव्हा कोर्टात आरोपीला जामिन मंजूर करण्यात आला.