कोल्हापूर - ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे व नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणातील दुसरा संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्या जामिनावर दि. ४ जानेवारी २०१८ रोजी सुनावणी ठेवण्यात आली. सरकार पक्षातर्फे तावडेच्या जामिनावर म्हणणे सादर न केल्याने शुक्रवारी होणारी सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पुढे ढकलली.
पानसरे हत्या प्रकरणातील डॉ. तावडे हा दुसरा संशयित आहे. या प्रकरणातील संशयित समीर गायकवाड हा सध्या जामिनावर बाहेर आहे. त्याचा जामीन रद्द करावा, यासाठी पानसरे कुटुंबीय व एसआयटीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संशयित तावडे हा पुण्यातील येरवडा कारागृहात आहे. त्याला जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला. यावेळी सरकार पक्षातर्फे या अर्जावर म्हणणे मांडावे, अशी विनंतीही अॅड. पटवर्धन यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी सुनावणी होती. परंतू परकार पक्षाचे वकील शिवाजीराव राणे यांनी म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली. आरोपीचे वकील अॅड. समीर पटवर्धन हे न्यायालयात उपस्थित होते.